ग्रामीण उद्यमशीलता वाढीस लागावी अशी परिसंस्था निर्माण करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

उद्यमशीलता वाढीस लागावी अशी परिसंस्था निर्माण करण्याचे आवाहन करतांनाच युवकांनी रोजगार मागणारे बनण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे बनावे, यासाठी युवकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम.व्यकंय्या नायडू यांनी केले. ओदिशातल्या भुवनेश्वर इथे भारतीय युवा शक्ती ट्रस्टने आयोजित केलेल्या एका परिषदेला ते संबोधित करत होते. बेरोजगारी ही केवळ भारतासाठीच नव्हे, तर सर्व देशांसाठी चिंतेची बाब आहे, यावर मात करण्यासाठी युवकांना उद्योजक बनण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे ते म्हणाले. भारतात युवकांची संख्या मोठी असून, त्यांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर केला जावा, असे उपराष्ट्रपती म्हणाले. तंत्रज्ञानावर अवलंबून असलेल्या जगातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी योग्य पायाभूत विकास आणि उत्तम कौशल्य शिकवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

शहरी – ग्रामीण भागातली वाढत्या दरीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. शेती शाश्वत आणि किफायतशीर बनवणे, ग्रामीण कारागिरांसाठी बाजारपेठ निर्माण करणे, ऑनलाईन मंचाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना त्यांच्या कलावस्तू विकण्यासाठी सक्षम करणे, तसेच परवडणारी शिक्षण आणि आरोग्य सेवा पुरवणे यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला. भारताच्या विशिष्ट पारंपारिक कला आणि हस्तकलेला प्रोत्साहन देणारा व्यवसाय तरुण उद्योजकांनी सुरु करावा, असा सल्ला त्यांनी दिला. या विशिष्ट क्षमतांचा देशाने उपयोग करुन घ्यावा आणि व्यापार मेळावे आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या उत्पादनासाठी नवीन बाजारपेठेचा शोध घेतला जावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. छोटे आणि मध्यम उद्योग देशाच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावतात असे सांगून या उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करुन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील अद्याप समोर न आलेल्या सामर्थ्याचा तरुण उद्योजकांनी शोध घ्यावा आणि त्यांचे राहणीमान उंचवावे अशी सूचना त्यांनी केली. महिला सक्षमीकरण हे केवळ राष्ट्रीय उद्दिष्ट न राहता राष्ट्रीय कार्यक्रम बनावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपराष्ट्रपतींनी ग्रामीण उद्योजकांना पुरस्कार प्रदान केले, तसेच बीवायएसटी हे ऑनलाईन पोर्टल सुरु केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email