कल्याणमध्ये थरार, मोबाईल हिसकावणाऱ्यावर झडप दुसरा, चोरटा पसार
डोंबिवली दि.२९ :- कल्याण स्टेशन परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसागणिक चोरट्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास थरार घडला. दोघांचे मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या एका चोरट्याला नागरिकांनी पकडले. तर त्याचा साथीदार मात्र गर्दीचा फायदा घेत निसटण्यात यशस्वी झाला. उमेर शेख असे या चोरट्याचे नाव आहे.
हेही वाचा :- शरद पवार यांच्या हस्ते टाटा मोटर्सचे दिमाखदार उद्घघाटन
मुरबाड येथे राहणारा दीपक सावंत व भिवंडी येथे राहणारा आशिष यादव यांनी मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण एसटी स्थानक येथून एसटी पकडली. यावेळी गर्दीचा फायदा घेत दोन चोरट्यांनी हातचलखीने दीपक व आशिष यांच्या खिशातील मोबाईल लंपास केले. काही क्षणात दोघांना मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ आरडाओरड सुरू केली.
हेही वाचा :- पर्सनल गोष्टि सोशल मिडियावर टाकू नका.
नागरिकांनी प्रसंगावधान राखत या दोन्ही चोरट्यांचा पाठलाग केला. दोन चोरट्यांपैकी उमेर शेख नागरिकांच्या हाती लागला. त्याला पकडून चोप दिल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. तर त्याचा साथीदार मात्र निसटण्यात यशस्वी झाला. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी उमर शेख विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याच्या फरार साथीदाराचा शोध सुरू केला आहे.