महावितरणचे सिटीझन चार्टर झाले अद्यावत : माहितीच्या आधारे ग्राहक सेवांचे बळकटीकरण

Hits: 0

नवीन सिटीझन चार्टरमुळे ग्राहक सेवेत संख्यात्मक व गुणात्मक बदल होतील

( म. विजय )

महावितरणच्या अद्यावत सिटीझन चार्टरचे (नागरिकांची सनद) प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे. ग्राहकांना दैनंदिन जीवनात कंपनीशी संबंधित विविध सेवा मिळवण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबींची माहिती या सिटीझन चार्टर मध्ये देण्यात आली आहे. ग्राहक सेवेच्या बांधिलकीतून कंपनीने उचललेले हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. ‘सिटीझन चार्टर’ मध्ये ग्राहकांना आवश्यक सर्व सेवा-सुविधांच्या माहितीचा समवेश करण्यात आला असून या सर्व माहितीची मांडणी सोप्या व सुटसुटीत पद्धतीने करण्यात आली आहे. अद्ययावत सिटीझन चार्टर महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या नवीन अद्यावत सिटीझन चार्टरमुळे महावितरणच्या ग्राहक सेवेत संख्यात्मक व गुणात्मक बदल होतील असा विश्वास महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे.

महावितरणच्या सिटीझन चार्टरचे प्रकाशन शुक्रवार दि.१३ सप्टेंबर रोजी केंद्रीय वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष पी.के. पुजारी व राज्य वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते व केंद्रीय वीज नियामक आयोगाचे मुख्य नियामक सुशांत चॅटर्जी, राज्य वीज नियामक आयोगाचे सदस्य मुकेश खुल्लर व आय.एम. बोहरी, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पराग जैन नानोटिया, पॉवर सिस्टीम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक केव्हीएस. बाबा यांच्या उपस्थितीत झाले.

महावितरणद्वारे ग्राहकांना २४ तास दर्जेदार व अखंडित वीज पुरवठा करण्यात येतो. या अद्यावत ‘सिटीझन चार्टर’मुळे ग्राहकांना सेवेची गुणवत्ता, सेवेची निवड, सेवा मिळण्याचे ठिकाण, विहित पद्धत, पारदर्शकता, विश्वासार्हता याबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे. या सिटीझन चार्टर मध्ये ग्राहक सेवेप्रती महावितरणचे ध्येय, उद्दिष्ट, प्रशासकीय संरचना, ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्व सेवांची माहिती तपशीलासह व आवश्यक त्या संदर्भासह देण्यात आली आहे. त्याचबरोबर या सेवांकरता आवश्यक वेळ, त्याची पद्धत, तक्रार निवारण पद्धत या सर्वांचा समावेश या सिटीझन चार्टर मध्ये करण्यात आला आहे. महावितरणने गेल्या काही वर्षात तंत्रज्ञांचा अधिकाधिक वापर करत ग्राहकांना बहुतांश सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्राहकांना घरबसल्या या सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे आधीच्या सिटीझन चार्टर मध्ये काळानरूप बदल करत अद्यावत सिटीझन चार्टर ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या सिटीझन चार्टर मध्ये महावितरणचे संकेतस्थळ, पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा, नवीन जोडणी, बिल दुरुस्ती, नावात बदल, पत्ता बदल, चेंज ऑफ टेरिफ, मिटर टेस्टिंग, बिल विषयक सेवा, वीज पुरवठा विषयक सेवा, नवीन जोडणी, नावात बदल, लोड मध्ये बदल, गो -ग्रीन सुविधा, ग्राहकाने मीटर रिडींग जमा करणे, नवीन वीज जोडणी, तात्पुरती जोडणी, पुर्नर जोडणी, बिल भरणा, बिलिंग तक्रारी, सुरक्षा ठेव परतावा, मीटर टेस्टिंग, मीटर बदली करणे, लाईन शिफ्ट करणे, ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ऑफ लाईन सुविधा, विविध सेवा पुरवण्यासाठी येणार खर्च, विविध सेवांकरता असलेले ‘स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर’, विविध सेवा करता आवश्यक कालावधी, तक्रार निवारण यंत्रणा, तक्रार निवारण्याचा विविध पातळ्या, माहितीचा अधिकार, आवश्यक फोन नंबर, ग्राहक सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी व सर्व सेवांच्या करता आवश्यक अर्ज आदी माहिती या सिटीझन चार्टर मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

महावितरणच्या सर्व पातळ्यांवरील कार्यालयाच्या कामात अधिक पारदर्शकता आणणे, ग्राहकांना कमीत कमी खर्चात अधिकाधिक दर्जेदार सेवा पुरवणे, ग्राहकांना पारदर्शक पद्धतीने प्रभावी व गतिमान पद्धतीने सेवा देण्यासाठी तंत्रज्ञांचा वापर वाढवणे, संपर्क साधणाऱ्या प्रत्येक ग्राहकास गुणवत्तापूर्ण प्रतिसाद देणे असे उद्देश या सिटीझन चार्टर प्रसिद्ध करण्यामागे आहेत. सिटीझन चार्टर मुळे ग्राहकांच्या दृष्टीने महावितरण बाबतचा एक अद्यावत, उपयुक्त व परिपूर्ण माहिती कोश उपलब्ध झाला आहे. ग्राहक सेवा पुनर्रचनेच्या दृष्टीने उचलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. सिटीझन चार्टरमुळे ग्राहकांची सोय होणार असून कंपनीचा सेवा विषयक खर्च कमी होण्यास मदत होऊ शकतो. सिटीझन चार्टर मधील माहितीच्या आधारे ग्राहकांचे बळकटीकरण्याचा प्रयत्न महावितरणने केला आहे. यामुळे ग्राहक आणि महावितरण यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण होण्यास मदत होणार आहे.

सिटीझन चार्टरमध्ये ग्राहक दृष्टीने सर्व आवश्यक मुद्यांचा समावेश करून विस्तर माहिती त्याची सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यामुळे महावितरणच्या सेवेत अधिक पारदर्शकता येणार आहे. या माहितीमुळे ग्राहकांना त्यांना आवश्यक सेवेस किती कालावधी लागेल, संबंधित व्यक्ती कोण असेल, त्याची विहित पद्धत कोणती असेल याबाबत निश्चित माहिती मिळणार आहे. ग्राहकांना वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने सेवा मिळण्यास मदत होणार असून ग्राहकांचे संपूर्ण समाधान होण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे, असे मत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री संजीव कुमार यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.