इस्रोच्या अध्यक्षांचा बेंगलुरु येथे माध्यमांशी संवाद
नवी दिल्ली, दि.११ – इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे इस्रोचे अध्यक्ष के सिवान यांनी आज बेंगलुरु येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी ‘प्रेस मीट’ या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधला. राष्ट्र उभारणीसाठी इस्रोने 2018 मध्ये उपग्रह, प्रक्षेपक यान या संदर्भात केलेली कामगिरी त्यांनी मांडली. चांद्रयान-2 या मोहीमेसह यावर्षीच्या मोहीमांसंदर्भातही त्यांनी माहिती दिली.
हेही वाचा :- निवृत्तीवेतन नियमावली आणि भविष्य या संदर्भातल्या प्रशिक्षण कार्यक्रमाला डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले संबोधन
लघु उपग्रह प्रक्षेपक यान, पुनर्वापर करता येणारी प्रक्षेपक यानं यासह इतरही अनेक नवीन तंत्रज्ञानाचा आविष्कार या वर्षासाठी नियोजित आहे असे सिवान म्हणाले. मानवासहित अवकाशात भरारी घेणाऱ्या भारताच्या गगनयान या मोहीमेसंदर्भात बोलताना या मोहिमेअंतर्गत तीन भारतीय अंतराळवीर अंतराळात झेप घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गगनयान मोहीमेच्या व्यवस्थापनासाठी ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर या नव्या केंद्राची स्थापना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.