गावठी पिस्तूलासह दोघे तरुण गजाआड महात्मा फुले पोलिसांची लक्षवेधी कारवाई

Hits: 1

{नारायण सुरोशी}

कल्याण दि.०७ :- पिस्तुल विक्री करण्यासाठी कल्याणात आलेल्या दोघा तरुणांना कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केले आहे. शाहरुख सय्यद आणि आकाश शिंदे अशी दोघा आरोपींची नावे असून त्यांच्याकडून दोन गावठी बनावटीची पिस्तुले, चार मोबाईल हस्तगत करण्यात आली. या दुकलीने पिस्तुले कशासाठी व कुणाला विकण्यासाठी आणली होती याचा कसोशीने तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी विवेक पानसरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा :- राष्ट्र कल्याण पार्टी चा जाहीर पाठिंबा…

पोलिस निरीक्षक दीपक सरोदे आणि पोलीस शिपाई दीपक सानप यांना दोन इसम पिस्तुल विकण्यासाठी कल्याणात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने कल्याण पश्चिमेकडे मुरबाड रोडला सापळा रचला. दोघे तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. अंगझडती दरम्यान शाहरुख सय्यद (22), आकाश शिंदे (23) या दोघांकडून दोन गावठी पिस्तुल आणि 4 मोबाईल हस्तगत करण्यात आले. शाहरुख हा कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर येथे राहणारा आहे. त्याच्या विरोधात याआधी ठाणे नगर, खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा :- उद्धव ठाकरेंच्या टीकेला ‘मनसे’ उत्तर; मुख्यमंत्रीसाहेब, आधी वांद्रेतील घुसखोरांचे मोहल्ले साफ करा

तर आकाश शिंदे हा आधारवाडी चौकातील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणार आहे. त्याच्या विरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती डीसीपी विवेक पानसरे यांनी दिली. तर दुसऱ्या घटनेत अपहरण करून लुबाडणाऱ्या दुकलीला गजाआड करण्यात पोलिसांनी यश मिळविले आहे. रस्त्यावरून चालताना धक्का लागल्याने मोबाईल पडला, स्क्रीन तुटला, असे बहाणे करत भामटयांनी एका गृहस्थाचे अपहरण करत त्याच्याजवलील एटीएम कार्ड हिसकावून या एटीएमच्या आधारे दारू खरेदी तसेच एका दुकानातून मोबाईल खरेदी केल्याची घटना 22 जानेवारी रोजी घडली होती.

हेही वाचा :- Dombivali ; फरार लुटारू 2 वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात

या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांनी या लुटारूंचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्यांचा समांतर तपास अँटी रॉबरी स्कॉड करत होता. या गुन्ह्याचा उलगडा करत आरोपींना हुडकून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते. अखेर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगर येथून राजीव उर्फ राजू ढिल्लोर व गुरू उर्फ भुऱ्या परदबादे या दोघांना खडेगोळवली येथून बेड्या ठोकल्या. या दोघांकडुन पोलिसांनी रिक्षाही जप्त केली. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. यामधील राजीव उर्फ राजू ढिल्लोर याच्या विरोधात कोळसेवाडी, मध्यवर्ती, मानपाडा पोलिस ठाण्यात याआधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती डीसीपी विवेक पानसरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.