विरारमध्ये बविआचा राजकीय दहशतवाद, प्रदीप शर्मांचे चोर की पोलीस, बॅनर उतरवले

म. विजय
चोर की पोलीस या तीन शब्दांचे झणझणीत तिखट बहुजन विकास आघाडी ( बविआला) नको त्या जागी झोंबले आहे. शिवसेना आणि प्रदीप शर्मा उगाचच गुंडगिरी, दहशतवादाचा बाऊ करत आहेत. वसई-विरार मध्ये कुठेय दहशत?असेही विचारले जात होते. मात्र नालासोपारातील लढाईत बविआने नेहमीप्रमाणे राजकीय दहशतवादाचे हत्यार उपसले आहे. शर्मा यांचे अधिकृतपणे लावलेले 41 बॅनर महापालिकेतील सत्ताधारी बविआने जोर जबरदस्तीने उतरवले आहेत.

बविआचे आदेश पाळण्याच्या दडपणाखाली असलेल्या वसई विरार महापालिकेने रविवारी सुट्टीच्या दिवशीही कार्यक्षमता दाखवून लगोलग हे बॅनर उतरवण्याची धावपळ केली. विरार आणि नालासोपारात अधिकृतपणे शुल्क भरून लावलेले 41 बॅनर उतरवण्यात आले. याचवेळी बविआच्या नेत्यांच्या मोठमोठी छायाचित्रे असलेले बॅनर, नुसत्याच भूमिपूजनाची जाहिरातबाजी करणारे होर्डींग मात्र नाक्यानाक्यावर तसेच आहेत.

नालासोपारातून लढण्याच्या तयारीत असलेल्या सुपरकॉप प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून हे बॅनर लागले होते. बॅनर कंत्राटदारालाही ते काढण्यासाठी धमकवण्यात आले होते. ते का काढले जातायत, असे विचारल्यावर आयुक्त बळीराम पवार यांनी सर्वच बॅनर उतरवतोय असे सांगितले होते. मात्र अधिकृतपणे लावलेले बॅनर कुणाच्या आदेशाने उतरवले याचे उत्तर आयुक्त वा इतर महापालिका अधिकारी द्यायला तयार नाहीत. बविआचे बॅनरही सर्वत्र तसेच आहेत. या सगळ्याचे उत्तर कोण देणार?

Leave a Reply

Your email address will not be published.