भाजप शासनाने आता श्रीराममंदिराचे आश्वासन पूर्ण करावे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
रामनाथी (गोवा) - अयोध्येतील श्रीराममंदिराच्या याचिकेवरील सुनावणीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने वेळकाढू भूमिका घेतली आहे. अशा वेळी भाजप शासनाने मागील कार्यकाळातच श्रीराममंदिर उभारणीसंबंधी अध्यादेश आणावा, अशी हिंदूंची अपेक्षा होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने श्रीराममंदिर उभारणीचे आश्वासन दिले असल्याने आता जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आदर राखून सरकार स्थापन होताच त्यांनी श्रीराममंदिराचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे अपेक्षित आहे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केली. भाजप सरकारने अलाहाबादचे नामकरण ‘प्रयागराज’ असे करून, तसेच कुंभमेळ्याचे सुयोग्य नियोजन करून एक चांगली कृती केली आहे; मात्र श्रीराममंदिराची उभारणी न झाल्यास हिंदूंच्या मनात ‘आश्वासन देऊन विश्वासघात केल्या’ची भावना प्रबळ होऊ शकते, असेही ते म्हणाले. 29 मे या दिवशी श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहात ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी प.पू. भागीरथी महाराज, स्वामी श्रीरामज्ञानीदासजी महाराज, बंगाल येथील श्री सत्यानंद महापिठाचे स्वामी आत्मस्वरूपानंदजी महाराज, सद्गुरु नंदकुमार जाधव, तसेच सदगुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पू. नीलेश सिंगबाळ यांनी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला. 29 मे ते 4 जून या कालावधीत चालणार्या या 7-दिवसीय अधिवेशनाच्या प्रथम दिनी भारत आणि बांगलादेश येथून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे 240 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित आहेत. ‘हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात ‘सीबीआय’कडून झालेल्या अन्याय्य अटके’चा अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात निषेध करण्यात आला.

श्रीराममंदिराची उभारणी न झाल्यास हिंदु समाज देशव्यापी आंदोलन उभे करेल ! – अधिवक्ता हरिशंकर जैन, अध्यक्ष, ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’
श्रीराममंदिर हा हिंदूंच्या अस्मितेचा विषय आहे. वर्ष 2014 मध्ये भाजपने श्रीराममंदिराचे आश्वासन दिले होते; मात्र ते पूर्ण झाले नाही. पंतप्रधान श्री. मोदी यांना हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी हिंदूंनी परत एकदा बहुमताने निवडून दिले आहे. त्यामुळे आता तरी भाजप शासनाने अध्यादेश काढून श्रीराममंदिराचा मार्ग सुकर करावा. मंदिर उभारणी झाली नाही, तर देशातील हिंदु समाज पेटून उठेल आणि देशव्यापी आंदोलन उभे करेल, अशी चेतावणी लक्ष्मणपुरी (लखनऊ) ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे अध्यक्ष अधिवक्ता हरिशंकर जैन यांनी अधिवेशनात दिली.
विद्यमान न्यायव्यवस्थेमध्ये न्याय नाही ! – अधिवक्ता राजेंद्र वर्मा, सर्वोच्च न्यायालय
विद्यमान न्यायव्यवस्थेमध्ये न्याय मिळत नाही, तर मिळतो तो फक्त निकाल ! न्यायालयात श्रीराममंदिराचा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी आपल्याला राज्यघटनेच्या पुढे जाऊन विचार करावा लागेल. यासाठी जनआंदोलन आणि हिंदु समन्वय आवश्यक आहे. आध्यात्मिक बळाच्या आधारावरच सामाजिक आणि राष्ट्राचा विकास होणार आहे. अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण हे एक मोठे षड्यंत्र आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता राजेंद्र वर्मा यांनी ‘अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणामुळे होणारी भारतीय संस्कृतीची हानी’ या विषयावर बोलतांना केले.
या वेळी ‘हिंदु समाजाने त्यांचे राज्य चालवण्यासाठी योग्यता आणि सामर्थ्य कसे आणावे’ या विषयावर मार्गदर्शन करतांना भोपाळ (मध्यप्रदेश) येथील राजसूय हिंदू विद्या केंद्राचे प्रा. रामेश्वर मिश्र म्हणाले, ‘‘जेवढी देशभक्ती हिंदूंमध्ये आहे, तेवढी विश्वात अन्य कोणाकडे नाही; मात्र हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी तेवढे पुरेसे नसून आत्मबलाची आवश्यकता आहे. सनातन शास्त्रानुसार मार्गक्रमण केल्यावरच हिंदु राष्ट्राची स्थापाना होईल.’’

या वेळी हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ या हिंदी भाषिक, ‘लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध करायच्या प्रत्यक्ष कृती’ या कन्नड भाषिक, ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’, या कन्नड भाषिक, औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ? या कन्नड भाषिक, तर सनातनच्या ‘मुंडू (लुंगीसारखे वस्र) यापेक्षा धोतर श्रेष्ठ असण्यामागील शास्त्र’, या तामिळ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांनी वेदमंत्राचे पठण केले. या प्रसंगी कांची कामकोटी पीठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी विजयेंद्र सरस्वतीजी यांनी दिलेले आशीर्वचन सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. अशोक पात्रीकर यांनी, तर सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेचे धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. अधिवेशनाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले.