भाजप, कोणार्क आघाडीने उलथविली भिवंडीत कॉंग्रेस-शिवसेनेची सत्ता!

महापौरपद निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव

भिवंडी दि.०५ :- भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस-शिवसेना आघाडीला दारुण पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौगुले आणि माजी महापौर विलास आर. पाटील यांनी आघाडीची सत्ता उलथवून चमत्कार केल्याने कोणार्क आघाडीला विजय मिळविता आला. महापौरपदी प्रतिभा विलास पाटील यांची निवड झाली असून, कॉंग्रेसच्या रसिका पप्पू रांका यांचे महापौरपदाचे स्वप्न भंगले.

भिवंडी महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ९० जागांपैकी कॉंग्रेसने ४७ जागा मिळवून बहूमत संपादन केले. तर भाजपने २०, शिवसेनेने १२, कोणार्क आघाडी व रिपब्लिकन पक्षाने प्रत्येकी चार, समाजवादी पक्षाला दोन आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे कॉंग्रेसने २०१७ मध्ये स्वबळावर महापौरपद जिंकण्याची तयारी सुरू केली होती. तर भाजपचे खासदार कपिल पाटील, महेश चौगुले यांनी शिवसेना, कोणार्क आघाडी व रिपब्लिकन पक्षाला एकत्र करीत कॉंग्रेसला आव्हान देण्याची तयारी सुरू केली होती.

हेही वाचा :- बस पकडण्यासाठी जात असताना बसच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू

मात्र, खासदार कपिल पाटील यांना शिवसेनेची साथ मिळाली नाही. भिवंडी शहरात कायम कॉंग्रेसशी टक्कर देण्याचे आव्हान निर्माण करणाऱ्या शिवसेनेने उपमहापौरपद मिळवून नांगी टाकली होती. अचानक शिवसेनेने माघार घेतल्यामुळे कॉंग्रेसला विजय मिळविता आला. महापौरपदी जावेद दळवी यांची, तर उपमहापौरपदी मनोज काटेकर यांची निवड झाली होती. कॉंग्रेसशी केलेल्या आघाडीमुळे भिवंडीतील कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात होता.

गेल्या अडीच वर्षांत भिवंडी महापालिकेतील कॉंग्रेस पक्षात सातत्याने धुसफूस होत होती. लोकसभा निवडणुकीच्यावेळी कॉंग्रेसच्या सुरेश टावरे यांच्याविरोधात काही नगरसेवकांनी बंड पुकारले होते. तर आता कॉंग्रेसच्या रसिका रांका यांची उमेदवारी पसंत नव्हती. त्यामुळे कॉंग्रेसमधील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. त्याचा फायदा खासदार कपिल पाटील, आमदार महेश चौगुले, विलास पाटील यांनी उठवून भिवंडीत चमत्कार घडला. अन्, कोणार्क आघाडीच्या प्रतिभा पाटील यांना महापौरपद मिळाले.

हेही वाचा :- भिमा-कोरेगावसह मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे न घेतल्यास…

विधानसभेपाठोपाठ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीची वल्गना करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना भिवंडीतून जोरदार धक्का बसला आहे. त्यामागे खासदार कपिल पाटील, महेश चौगुले आणि विलास पाटील यांची एकत्रित रणनिती कारणीभूत ठरली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भिवंडीतील नेत्यांचा आघाडीचा अभिमान ठरला फोल!

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर, भिवंडीत अडीच वर्षांपूर्वीच कॉंग्रेस-शिवसेनेची आघाडी झाली असल्याचा अभिमान शिवसेना व कॉंग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला होता. भिवंडीत आम्ही एकत्र येऊन भाजपला रोखल्याच्या वल्गना केल्या जात होत्या. मात्र, महापौर निवडणुकीत महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का बसल्यामुळे स्थानिक नेत्यांचा आघाडीचा अभिमान फोल ठरला आहे. त्याचबरोबर स्थानिक नेत्यांना पराभवाच्या नामुष्कीचा सामना करावा लागला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email