‘बेधुंद’ महाविद्यालयीन जीवनाचे प्रतिबिंब, पुस्तक समीक्षा।
‘खरगपूर येथील आयआयटीमधून एम.टेक ही पदवी मिळविलेले अविनाश लोंढे यांची ‘बेधुंद’ ही कादंबरी भान हरपलेल्या आजच्या काही महाविद्यालयीन तरुणांच्या बेबंद आणि बेधुंद जीवनाचे प्रतिबिंब आहे. अर्थात सर्वच महाविद्यालयीन तरुणाई अशीच असते असे नाही. नक्कीच काही अपवाद आहेत.
शाळेच्या शिस्तीतून बाहेर पडल्यानंतर महाविद्यालयीन जीवन (मग ते कोणत्याही शाखेतील असो) हे फुलपाखरासारखे स्वच्छंदी जगावे असे त्या वयात प्रत्येकाला वाटत असते. काही जण घरच्या संस्कारामुळे किंवा चांगल्या मित्रांच्या संगतीमुळे वाहावत जात नाहीत. पण काही जणांचे भान महाविद्यालयीन जीवनात पूर्णपणे हरपते आणि अनेकदा शाळेत हुुशार म्हणून गणल्या जाणाऱया काहींची महाविद्यालयीन जीवनात घसरण सुरु होते.
रॅगिंग, वेगवेगळी व्यसने, प्रेम प्रकरणे, अश्लील गप्पा, चित्रपट पाहणे, संदेश पाठविणे, दारुच्या पार्ट्या, भटकणे, दुचाकीवरुन भटकणे आणि इतर अनेक गोष्टी करणे म्हणजेच महाविद्यालयीन जीवन, तीच खरी मजा असा काहींचा गैरसमज झालेला असतो. हे सर्व करणे भूषणावह वाटत असते आणि हे न करणारा बावळट ठरत असतो. लोंढे यांच्या ‘बेधुंद’ या कादंबरीत पाच मित्रांची गोष्ट सादर करण्यात आली आहे. आज आपण समाजात महाविद्यालयीन किंवा तरुण पिढीच्या बाबतीत जे ऐकतो, वाचतो, पाहतो त्याचे चित्र लोंढे यांनी यात मोकळेपणाने मांडले आहे.
ही कादंबरी फाईव्ह स्टार ग्रुपची म्हणजे जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा या पाच मित्रांची, त्यांच्या आयुष्यात घडणाऱया घटनांची आहे. महाविद्यालयीन आणि वसतीगृहावरील जीवन, तेथील रॅगिंग यासह
रोहित, सोनिया, एच.डी. संग्राम, विनय, हर्षला, सचिन सर आदी व्यक्तिरेखाही कादंबरीत येतात. रॅगिंग, शिवजयंती, मेस कमिटी, निवडणूक तसेच जया-हर्षला आणि अक्षय-सोनिया यांचे प्रेमप्रकरण याचाही मसाला यात आहे. महाविद्यालयीन जीवनात घेतलेला लैंगिक सुखाचा अनुभव आणि अन्यही तरुणाईशी निगडीत असलेल्या गोष्टी कादंबरीत दाखविण्यात आल्या आहेत. कादंबरीतील व्यक्तिरेखांचे टवाळ आणि अश्लील बोलणे, शिव्यांचा वापरही पाहायला मिळतो.
लोंढे यांनी आजच्या तरुणाईची भाषा, त्यांचे प्रश्न, विषय बिनधास्त आणि बेधकपणे ‘बेधुंद’मध्ये मांडले आहेत. त्यामुळे काही जणांना ही कादंबरी आपल्या महाविद्यालयीन आणि वसतीगृहातील जीवनाची आठवण करुन देईल. काही जणांना सुहास शिरवळकर यांची ‘दुनियादारी’ किंवा त्यांच्याच अन्य काही कादंबऱया वाचत आहोत का, असाही प्रश्न पडेल. कादंबरीची लेखनशैली काहीशी विस्कळीत, तुटक आहे. पण अशा शैलीतील लिखाणाची आवड असणाऱयांना कदाचित तसे वाटणारही नाही. बेधुंद आणि बेभान जीवन म्हणजे सर्वस्व नाही आणि अयोग्य मार्गावरुन चालणे
किती धोकादायक असू शकते त्याचे चित्र ‘बेधुंद’च्या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ही कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली असून १८२ पृष्ठांच्या या कादंबरीचे मूल्य २५० रुपये इतके आहे.
-शेखर जोशी