गिअरच्या जागेवर बांबू लावून तो चालवत होता शाळेची बस
मुंबई दि.०७ – बसच्या गिअरच्या जागी बांबू बसवून शाळेची बस चालवल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या खार रोड परिसरात समोर आला आहे. मंगळवारी शाळेच्या दिशेने जात असताना एका बीएमडब्ल्यू गाडीला बस धडकली. बीएमडब्ल्यू मालकाने राज कुमारला याबाबत जाब विचारला असता स्टिअरिंगमुळे अपघात झाल्याच त्यानं सांगितलं. बीएमडब्ल्यू गाडीच्या मालकाने बसची पाहणी केली असता त्यात गिअरच्या जागी एक लाकडी बांबू बसवण्यात आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना बोलावलं.
हेही वाचा :- लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका डोंबिवलीकर तरूणाचा बळी
पोलिसांनाही हा प्रकार पाहिल्यानंतर धक्का बसला. त्यांनी चालक राज कुमारवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अशा प्रकारे गिअरच्या जागी बांबूचा वापर करून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी खार पोलिसांनी राज कुमार नावाच्या बस चालकाला अटक केली आहे. ही बस ‘पोदार’ या नावाजलेल्या शाळेची असल्याने सगळ्यांनीच आश्चर्याचा धक्का बसलाय. बस चालक राज कुमार याला बेदरकारपणे गाडी चालवणे आणि विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणे या कलमांतर्गत अटक करण्यात आली. नंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं.