आम्ही बरोबर असल्याने श्रीरंग बारणे यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढेल – रामशेठ ठाकूर
(विठ्ठल ममताबादे)
उरण दि.१७ – देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. मागच्या वेळी श्रीरंग बारणे दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. आता आम्ही बरोबर असल्याने मताधिक्य मोठ्या प्रमाणात वाढेल. शिवसेना दोन पावले प्रचार करीत असेल तर भाजप चार पावले प्रचारात पुढे असेल, अशी ग्वाही माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिली. मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप एकत्र आले आहेत. शनिवारी पनवेल येथील अशोका लॉन्स येथे दोन्ही पक्षांतील प्रमुख कार्यकर्त्यांचा मनोमीलन मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, संपर्कप्रमुख दत्ता दळवी, म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, महानगर संघटक प्रथमेश सोमण, महेंद्र थोरवे, रामदास पाटील, विक्रांत पाटील, दीपक निकम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मावळमध्ये दोन वेळा शिवसेनेने बाजी मारली आहे. अर्थात भारतीय जनता पक्षाबरोबर दोन्ही वेळी युती होती. या मतदारसंघात भाजपची ताकद जास्त असल्याने मावळ मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी सुरूवातीला भाजपने दावा केला होता, परंतु मावळ सेनेकडेच राहणार असून येथे श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. शिवसेनेच्या विजयासाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विशेष करून पनवेल, उरण तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मनोमीलन मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रचारात शिवसेना दोन पावले असेल तर आम्ही चार पावले पुढे जाऊन प्रचार करू, अशी ग्वाही भाजप नेत्यांनी यावेळी दिली. विशेष करून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थितांना आश्वासन दिल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. सुभाष देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. मागील निवडणुकीत माजी खासदार रामशेठ ठाकूर आपल्या सोबत नव्हते. यावेळी सोबत असल्याने मोठ्या फरकाने युतीचा विजय होईल, असे ते म्हणाले. भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रचार करावा. आपल्या पाहुण्यांना देखील युतीलाच मतदान करण्याचे आवाहन करावे, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. कर्जत नगरपालिका निवडणुकीत युतीने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. तेथील धनशक्तीला कार्यकर्त्यांनी पराभूत केले आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले. मी जितक्या निवडणुका लढविल्या त्यापैकी बहुतांशी राष्ट्रवादी विरोधात होत्या. त्यांना पराभूत सुद्धा केले आहे. त्यामुळे पवारांविरुद्धची लढाई मला नवीन नाही. आता माजी खासदार रामशेठ ठाकूर देखील आपल्या सोबत आहेत. त्यामुळे ही निवडणूक अधिक सोपी जाईल, असे श्रीरंग बारणे म्हणाले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी खासदारांच्या कामाचे कौतुक केले. तसेच युती शासनाच्या काळात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. फिर एक बार मोदी सरकार, असे सांगत एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.