दारु मटनाची मांडव प्रथा बंद करा एल बी पाटिल यांचे समाजाला आवाहन.
- दारुमुळे अनेकांचे जीवन उद्धवस्त.
- स्त्रियांचा अपमान करणाऱ्या प्रथाही बंद होणे काळाची गरज.
(विट्ठल ममताबादे)
उरण दि.२६ – लग्नात मांडव स्थापना ही विधी आदल्या दिवशी केले जाते.या रात्री घरातील पूर्वजांना,कुलदैवतांना मांडवात आणून गोंधळ घालून बोलाविले जाते.धवला गाणारी त्यांना धवल्यातून आळवून निमंत्रित करते.मेलेले पूर्वज यावेत यासाठी तळण चढविले जाते.पूर्वज आले तर त्यांना देण्यासाठी वडे तळले जातात. त्यावेळी नात्यातील चार माणसे एकत्र येऊन जेवतात हा मांडवाचा खरा अर्थ होता.आणि आहे.आज मात्र अनेक ठिकाणी मांडव, लग्न सोहळ्यात नको त्या गोष्टिना महत्व दिले जात आहे. त्यामुळे मांडव तसेच लग्नाची मुळ प्रथा, मुळ पावित्र्य बाजुलाच राहते. पूर्वी रीती रिवाज व संस्कृतीचे भान ठेवून मांडव प्रथा, लग्न सोहळे पार पाडले जायचे आज मात्र खरी मांडव प्रथा,लग्नाच्या खऱ्या रीती रिवाज आपण विसरलो असल्याची खंत जेष्ठ कवी,सामाजिक कार्यकर्ते,रायगड भूषण एल.बी.पाटिल यांनी व्यक्त केली आहे.लग्ना नंतर पतीच्या मृत्यु नंतर विधवा स्त्रियांना काही ठिकाणी वाईट वागणूक दिली जाते.
तिच्या गळ्यातील सोन्याचे दागीणे,आभूषणे जबरदस्तीने उतरविले जातात, तिला घरा बाहेर फिरन्यास बंदी घातली जाते.तिला चांगले वस्त्र, साडी, कपडे घालु दिले जात नाहीत.तीला वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते त्यामुळे अश्या स्त्रियांचा अपमान करणाऱ्या प्रथाही बंद झाल्या पाहिजेत असे मत एल बी पाटिल यांनी व्यक्त करत अनेक वेळा याबाबत जण जागृतीही केली आहे. पूर्वीच्या खऱ्या मांडव प्रथापेक्षा आजच्या मांडव प्रथेत खूप काही बदल झाले आहेत.आजच्या मांडव प्रथेत घाऱ्या पापडया नावापुरती बनवु लागली आहेत.सध्याच्या आजच्या मांडव प्रथेत 100 किलोहुन अधिक मटन व लाखो रुपयांची दारु तसेच मस्तीत रंगण्यासाठी डीजे लावली जाते.वास्तविक पाहता या गोष्टि मांडव प्रथेच्या विरोधात आहेत.
असे दारु पिउन मटन खाऊन लाखो रुपयांची उधळ पट्टी करून इतरंचा विचार न करता,परिस्थितीचा विचार न करता कष्टाच्या पैशांचा चुराडा केला जातो.अनेक ठिकाणी मांडवात दारु पिउन जवान तरुण मुले मृत्युमुखी पडत असल्याची उदाहरणे वर्तमानपत्रातून वाचावयास मिळत आहे. त्यामुळे ही मांडव प्रथा साजरा करणारा समाजही बदनाम होतो.त्यामुळे गेली 25 ते 30 वर्षापासून मांडव प्रथा बंद करा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते,अखिल भारतीय आगरी सामाजिक संघाचे कार्यकारिणी सदस्य तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख रायगड भूषण एल बी पाटिल समाजात फिरून,विविध जनजागृतीपर उपक्रमातून करीत आलेले आहेत.
सध्या लग्नाचे शुभ मुहूर्त जवळ आल्याने लग्न सराईला सुरवात होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर एल.बी.पाटिल हे गावागावात फिरून तसेच अनेकांच्या वयक्तिक गाठीभेटि घेऊन तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वतः जातीने हजर राहून विविध कविता रचुन,पत्रके वाटून दारु मटनाची मांडव प्रथा बंद करण्याचे आवाहन करीत आहेत.रायगड भूषण एल बी पाटिल यांच्या आवाहनाला अनेक ठिकाणी उत्तम प्रतिसादही मिळाला आहे. अनेक व्यक्तिंनी एल बी पाटिल यांच्या आवाहना प्रमाणे मुळ रीतीरिवाजानुसार,संस्कृती प्रमाणे मांडव प्रथा, लग्न सोहळा साजरा केला तर काही ठिकाणी मांडव प्रथाच बंद केली गेली.
हल्ली नको त्या पद्धतीने मांडव प्रथा तसेच विविध सण साजरे केले जातात.एखादा सण किंवा एखाद्या कार्यक्रम साजरा करताना मूळ उद्देश बाजुलाच राहत आहे.तेंव्हा नविन फळीतील(नविन पिढितील)जवान,तरुणांनी आपली संस्कृती रीती रिवाज आपली मूळ संस्कृती विसरता कामा नये.एखादे कार्यक्रम साजरे करताना इतरांना त्याचा त्रास तर होत नाही ना किंवा एखादा सण साजरे करताना किंवा एखाद्या कार्यक्रमामुळे कोणाच्या जीवाला धोका तर नाही ना याचा जरूर विचार करावा व त्यानुसारच सण,कार्यक्रम साजरे करावे असा संदेश एल बी पाटिल यांनी स्वतःच्या कृतीतून समस्त समाजाला दिला आहे.
(आजचे साखरपुडे खोटया प्रतिष्टेचे)
साखरपुडा म्हणजे नारळ फोडून साखर देऊन लग्न निश्चित करण्याचा विधी.पूर्वी दोन घरची(नवरा आणि नवरी) नात्यातली दोन दोन माणस एकत्र येत असत.नारळ फोडून चहा दिला जात असे.चहामध्ये साखर असल्याने त्याला पूर्वीचा ‘चहापाणी’ असा शब्द वापरला जात असे.नंतर साखरपुडा हा शब्द प्रचलित झाला.पूर्वी या विधीला भटजी नव्हता.सारे घरातील व्यक्ति एकत्र येत हा साखरपुडा साजरे करीत असत.आता 4 माणसा ऐवजी एक दोन हजार माणसे दारु पिण्यासाठी,मटनाचे जेवण खाण्यासाठी येत असतात.नवरा किंवा नवरीच्या घरचा तो डामडौल दाखविण्याचा प्रकार असतो.यासाठी अनावश्यक खर्च टाळून साखरपुडा हा विधिवत,घरातल्या घरात साजरा करावा असे मत विविध जनजागृती पर पत्रके वाटताना एल बी पाटिल यांनी व्यक्त केला आहे.