‘नवसाला पावणारा गणपति’ असे लिहिणार्‍या गणेश मंडळांवर अंनिसवाल्यांनी गुन्हा दाखल करून दाखवावाच ! – हिंदु जनजागृती समितीचे आव्हान

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या आडून हिंदूंच्या श्रद्धांवर घाला घालण्याचे षड्यंत्र पुन्हा उघड !

‘नवस’ हा सर्वसामान्य हिंदु भाविकाच्या श्रद्धेचा विषय आहे. भाविकाची जशी श्रद्धा, तसा त्याला त्याच्या प्रार्थनेचा, नवसाचा, गार्‍हाण्याचा लाभ होतो. अनेकदा देवतेच्या जागृत स्थानांच्या ठिकाणी किंवा भक्तांच्या श्रद्धेमुळे जागृत झालेल्या देवस्थानांच्या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रचीती आजवर लाखो भक्तांनी घेतल्या आहेत. असे असतांना आता भक्तांच्या श्रद्धांवरच आघात करण्याचा प्रयत्न ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने चालवला आहे. देवता, भक्ती, पूजा, नवस आदी सर्व गोष्टी या आस्तिकांच्या अर्थात श्रद्धाळू समाजाच्या नित्याच्या गोष्टी आहेत, अर्थात याबाबत नास्तिकतावाद्यांना काय कळणार ? ‘गाढवाला गुळाची काय चव ?’ या म्हणीचा प्रत्यय आज अंनिसवाल्यांच्या या धमकीवजा आवाहनातून दिसून येत आहे. अंनिसवाल्यांनी गणेश मंडळांना अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा धाक दाखवून धमकावणे बंद करावे. ‘लालबागचा राजा’, ‘श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती’ आदीसारख्या असंख्य गणेश मंडळांच्या गणरायावर कोट्यवधी भक्तांची श्रद्धा आहे. त्यांच्या श्रद्धेमुळे लाखो भक्तांनी अनुभूतीही घेतल्या आहेत. या श्रद्धेला तडा देण्याचा अंनिससारख्या नास्तिकतावाद्यांना काहीएक अधिकार नाही. तरी जर त्यांना हिंदूंच्या श्रद्धांवर आघात करायचाच असेल, तर अंनिसवाल्यांनी एखाद्या गणेश मंडळावर गुन्हा दाखल करून दाखवावाच, असे आव्हान हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी दिले आहे.

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली बनवलेला ‘जादूटोणा विरोधी कायदा’ हिंदुविरोधी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या कायद्याविरोधात हिंदु जनजागृती समितीने प्रदीर्घ लढा दिला. दाभोलकरांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत तत्कालीन काँग्रेसी शासनाने हा कायदा अध्यादेश काढून महाराष्ट्रावर लादला. या कायद्याची निर्मिती करतांना यातील २७ कलमांपैकी तब्बल १५ हिंदुविरोधी कलमे समितीने केलेल्या आंदोलनामुळे रहित करावी लागली ! या कायद्यानुसार ‘सत्यनारायणाची पूजा’, ‘वारीला जाणे’ आदी गोष्टी गुन्हा ठरवल्या जातील, हे आम्ही अनेकदा सांगितले. ही कलमे रहित केल्यानेच आज हिंदु समाज धर्माचरण करू शकत आहे. आता पुन्हा एकदा याच कायद्याचा धाक दाखवून ‘नवस बोलणे’ यावर गदा आणण्याचा प्रयत्न होत आहे. यातून आम्ही व्यक्त केलेला संभाव्य धोका खरा ठरतांना दिसत आहे. आज हे अंनिसवाले मंडळातील गणपतीला नवस बोलण्यावर गुन्हा दाखल करतील, उद्या शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर, मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिर, कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मी मंदिर आदी शेकडो जागृत मंदिरांत नवस बोलण्यावरही निर्बंध आणतील. हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. अंनिसला गुन्हाच दाखल करायचा असेल, तर त्यांनी मोहरमच्या दिवशी ‘मातम’ प्रथेमध्ये शरीरावर इजा करून घेणार्‍यांवर, तसेच ‘होली वॉटर’च्या नावाखाली अभिमंत्रित जल विकणार्‍या चर्चच्या पादर्‍यांवर गुन्हा दाखल करून दाखवावा, असे आवाहनही श्री. घनवट यांनी केले आहे.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email