अखेर, स्वतः राज ठाकरेंनीच तयारीचे संकेत दिले आणि मनसैनिकांचे डोळेच चमकले!
नवी मुंबई दि.२५ :- सानपाडा येथे आयोजित पश्चिम महाराष्ट्र महोत्सव प्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. या वेळी पालिका निवडणूक कालावधीत नवी मुंबईत आपली तोफ डागणार असल्याचे ठाकरे यांनी संकेत दिले. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मनसैनिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे उमेदवार उतरवणार असल्यावर राज ठाकरे यांच्याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. निवडणूक काळात शहरात आपली सभा लागल्यास राजकीय भाष्य करू, असे वक्तव्य त्यांनी सानपाडा येथे केले.
हेही वाचा :- नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांची 9 मार्चला प्रसिद्धी
निवडणूक काळात शहरात आपली सभा लागल्यास राजकीय भाष्य करू, असे वक्तव्य त्यांनी सानपाडा येथे केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे मनसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष स्थापनेपासून नवी मुंबईतील मनसैनिक पालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. परंतु पक्षाकडून निवडणूक लढवत असल्याची अधिकृत घोषणा होत नसल्याने त्यांचा हिरमोड होत होता.
हेही वाचा :- ठाणे भाजप तर्फे आयोजित धरणे आंदोलनात आमदार संजय केळकर यांची सरकारवर घणाघाती टीका..
पर्यायी नाराज मनसैनिकांकडून बंडखोरी करून निवडणूक लढवली जात होती. तर मागील दहा वर्षांत अनेकांनी पक्ष निवडणूक लढवत नसल्याच्या कारणावरून पक्षांतर केले आहे.काही महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारच्या गळतीला नवी मुंबईत सुरुवात झाली होती. परंतु शहर अध्यक्ष गजानन काळे व पक्षाच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या हालचालीमुळे ही गळती थांबली होती. अशातच पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनीच महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात सभा होणार असल्याचे संकेत दिल्याने मनसैनिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.