प्रवासी हंगामात भरमसाठ दरवाढ करून प्रवाशांची लूट करणार्या खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती
Hits: 0
मुंबई – खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाड्यापेक्षा जास्तीत जास्त दीडपट भाडे आकरण्याचा (शासनाचे दर 100 रुपये असतील, तर खाजगी ट्रॅव्हल्सवाले 150 रुपये घेऊ शकतात.) नियम दिनांक 27 एप्रिल 2018 च्या शासन आदेशाद्वारे करण्यात आला आहे. असे असतांनाही खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक दिवाळीत, अन्य सणांच्या वेळी, तसेच सुटीच्या कालावधीत तिकिटदरात दुप्पट-तिप्पट वाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत. याला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत मुंबईचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि राज्याचे परिवहन आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
मुंबई ते कोल्हापूर या प्रवासासाठी वातानुकूलित शयनयानाचा तिकिट दर खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक अधिकाधिक 1 हजार 86 रुपयापर्यंतच आकारू शकतात; मात्र या दिवाळीच्या काळात खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकिटदर 1 हजार 400 ते 2 हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आले होते. राज्यात सगळीकडे अशीच परिस्थिती होती. पनवेल ते सांगली, असा नियमितचा दर 300 ते 350 रुपये इतका असतांना दिवाळीत हा दर 1 हजार 100 रुपयापर्यंत होता. शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांचे फावले आहे.
यावर उपाययोजना म्हणून प्रथम शासन निर्णयाची सर्वत्र प्रसिद्धी व जागृती करावी, प्रत्येक खाजगी प्रवासी बसवर आणि तिकिट केंद्रावर संबंधित मार्गावरील शासकीय परिवहन सेवेचे दरपत्रक आणि खाजगी दरपत्रक दर्शनी भागात लावावेत, तक्रार करण्यासाठी शासकीय अधिकार्यांचे संपर्क क्रमांक व पत्ते देण्यात यावेत, तसेच खाजगी ट्रॅव्हल्सचे संकेतस्थळ, अॅप, तसेच खाजगी बस तिकिटाच्या पुढील वा मागील बाजूस हे दर प्रसिद्ध करणे कायद्याने बंधनकारक करावे, अशा मागण्या हिंदु जनजागृती समितीने केल्या आहेत.