गुजरातच्या भरुच मध्ये दिन दयाळ दिव्यांग पुनर्वसन योजनेद्वारे गिनिज विश्वविक्रमाची नोंद
नवी दिल्ली, दि.०१ – दिनदयाळ दिव्यांग पुनर्वसन योजनेच्या राष्ट्रीय परिषदेचे आज केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी या योजनेविषयी विस्तृत माहिती दिली. गुजरात मधल्या भरुच इथे काल 8 तासांच्या कालावधीत 260 दिव्यांगाना आधुनिक कृत्रिम अवयव (पाय) बसवण्यात आले. यामुळे 7व्या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नव्या विश्वविक्रमाची नोंद झाल्याचे गेहलोत यांनी सांगितले. या आधीच दिनदयाळ दिव्यांग पुनर्वसन योजनेने इतर विभागात 6 विश्वविक्रम प्रस्थापित केल्याचेही गेहलोत म्हणाले.
हेही वाचा :- औद्योगिक कामगारांकरता जानेवारी 2019 चा ग्राहक मूल्य निर्देशांक जारी
दिनदयाळ दिव्यांग पुनर्वसन योजना आणि देशातल्या सर्व दिव्यांगासाठी हा अभिमानाचा क्षण आहे, असे गौरवोद्गार गेहलोत यांनी काढले. या योजनेअंतर्गत कर्णबधिर दिव्यांगासाठी 6 हजार शब्दांचा शब्दकोश तयार करण्यात आला असून, 1700 मुलांना कोहलेर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. आतापर्यंत 28 राज्यांनी 13 लाख दिव्यांगांना ‘सार्वत्रिक ओळखपत्र’ दिली असून, लवकरच देशातल्या सर्व दिव्यांगांना अशी ओळखपत्र देण्यात येतील असंही गेहलोत यांनी सांगितले. दिव्यांगांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. दिनदयाळ योजनेअंतर्गत अनेक नवे उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.