30 विविध परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

विनोद तावडेंचा पुतळाही जाळला

(म.विजय)

ठाणे – शैक्षणिक दर्जावरच प्रश्नचिन्ह लागलेल्या मुंबई विद्यापीठाचा सावळागोंधळ कायमच आहे. विद्यापीठाने शनिवारी तब्बल 30 परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची घोषणा केली. कॉमर्स आणि मॅनेजमेंट शाखेसह आर्ट्स शाखेच्या विविध परीक्षांचा यामध्ये समावेश आहे. याचा निषेध करण्यासाठी आ. जितेंद्र आव्हाड आणि आनंद पराजंपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष अभिजीत पवार आणि विद्यार्थ्यांनी ठाण्यात रास्तारोको आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पुतळादेखील जाळला.
विद्यापीठाने शनिवारी आपल्या वेबसाइटवर सुधारित वेळापत्रक जाहीर केले. या परीक्षांमध्ये प्रामुख्याने ’एलएलएम’च्या परीक्षांचा अंतर्भाव आहे. त्याचप्रमाणे सायन्स शाखेतील एमएससी फॉरेन्सिक सायन्स सेमिस्टर-1ची 16 एप्रिलपासून सुरू होणारी परीक्षाही लांबणीवर पडली असून, ती आता 4 जूनपासून सुरू होईल. कॉमर्स, मॅनेजमेंट, आर्ट्स शाखेच्या सर्वाधिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, यामध्ये बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट, सेमिस्टर-5), बीकॉम (अकाऊंट्स अँड फायनान्स) या परीक्षांचा समावेश आहे. तर आर्ट्स शाखेच्या टीवायबीए, एमएच्या परीक्षांसाठीही नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. याचा निषेध करण्यासाठी अभिजीत पवार, शाहरुख सय्यद, विक्रांत घाग, महेश सिंग ,सुरज यादव, राकेश चौहान ,प्रफुल्ल कांबळे,समीर पवार,दीपेश पांचाळ, इम्रान हकिम , करन किने , मुस्तफा भानपुरवाला ,सम्राट पांडे ,फैझल खान ,नासिर शेख ,शाहनवाज खान ,फहाद शेख ,अनिकेत भेवले आदी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आग्रा रोड येथील अल्मेडा सिग्नल येथे दुपारी 4 वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले. तसेच, याच ठिकाणी विनोद तावडे यांचा पुतळादेखील जाळला.
दरम्यान, वर्षभर मेहनत केलेल्या विद्यार्थ्यांवर परीक्षा पुढे ढकलून अन्याय करण्याचे सत्र विद्यापीठाने सुरु ठेवले आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून ज्ञानेश्वर विद्यापीठाचे पदवीधर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना वर्षभर अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांचे दु:ख समजत नाही. आमच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न तावडे करीत आहेत. त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी अभिजीत पवार यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email