25 हजार वृक्षांचे पुर्नरोपण, झिरो अजेंडावर शिक्कामोर्तब,उद्यान व तलावांचे संवर्धनावर वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये होणार चर्चा

( म विजय )

ठाणे (17) महापालिका क्षेत्रात जवळपास 25 हजार वृक्षांचे पुर्नरोपन करण्याच्या महत्वाच्या निर्णयाबरोबरच यापुढे शहरातील उद्यांनांचे आणि तलावांचे संवर्धन या विषयी वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये चर्चा करण्याचा तसेच वृक्ष प्राधिकरणाच्या प्रत्येक सदस्याने या समितीचे कामकाज पारदर्शी करण्याच्यादृष्टीने कामकाज करण्याच्या निर्णयावर आज वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले. दरम्यान समितीचे कामकाज प्रभावी, जलदगतीने आणि लोकाभिमुख व्हावे यासाठी महापालिका आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी विविध समिती गठित करण्याची घोषणा करण्याबरोबरच स्थानिक गृहनिर्माण संस्थांनी त्या त्या परिसरातील उद्याने व वृक्षांचे संवर्धन करण्याबाबत पुढाकार घेतल्यास त्याचा प्राधान्याने विचार करण्यात येईल असेही श्री. जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

महापालिका वृक्षप्राधिकरण समितीची आज महत्वाची बैठक ठाणे महापालिकेचे आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष संजीव जैयस्वाल यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शहरात 5 लक्ष वृक्ष लागवडीबाबत राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरीची दखल घेतल्याबाबत समाधान व्यक्त करून वृक्षप्राधिकरण समिती ही फक्त वृक्ष तोडीसाठीच असते असा गैरसमज खोडून काढून समिती आदर्शवत आणि लोकाभिमुख काम करणार असल्याचे सांगून यापुढे वृक्षप्राधिकरणाच्या कार्यामध्ये समिती सदस्यांबरोबरच शहरातील नागरीकांचेही सहकार्य घेण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर समितीमधील सर्व सदस्यांनी आपापल्या परिसरातील उदयाने, रस्ते वा पदपथ या ठिकाणची जबाबदारी घेऊन त्या परिसरातील नागरिकांच्या सहभागातून वृक्षरोपण करणे व त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त यांनी यावेळी केले.

यावेळी ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग होणारा वृक्ष निधी हा वृक्ष प्राधिकरणांच्या योजनांवरच खर्च करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या व्यतिरिक्त कोणतेही प्रस्ताव नसलेली झिरो अजेंडा बैठकही यापुढेही घेतली जाणार असून या बैठकीत शहरातील वृक्षांचे संवर्धन व लागवड व इतर उपाय योजना या महत्वाच्या विषयावरच चर्चा करण्याचे आजच्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. तसेच समितीचा कारभार पारदर्शक असावा यासाठी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधण्यात येईल असेही या बैठकीत ठरविण्यात आले.

ठाणे महानगरपालिकेच्या प्रकल्पात आणि काही विकासकांच्या नियोजित प्रकल्पात बाधित होणा-या वृक्षांना पुर्नरोपन करणे व अपरिहार्य कारणास्तव वृक्ष तोडणीला आज ठाणे महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर देण्यात आली असली तरी समितीने घेतलेल्या नविन धोरणानुसार तोडण्यात आलेले व पुर्नवृक्षरोपण करण्यात येणारे असे एकूण 25 हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हया वृक्षांचे पुर्नरोपण झाले का याची तपासणी प्राधिकरणामार्फत करण्याचे आज बैठकीत एकमताने ठरविण्यात आले आहे.

त्यानुसार आजच्या बैठकीत ठाणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणा-या एकूण 425 वृक्ष तोडण्याची तर शहरामधील विकास प्रस्तावातंर्गत बाधित होणा-या 1 हजार 90 वृक्ष तोडण्याची परवानगी देण्यात आली. यातील 228 वृक्ष हे सुबाभुळ जातीची आहेत. दरम्यान या वृक्षांच्या बदल्यात एकूण 16,350 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तर पुर्नरोपन करण्यात येणा-या 1662 वृक्ष तोडीच्या बदल्यात संबंधित विकासांकडून एकूण 8 हजार 310 वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याशहरात एकूण अंदाजे 25 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.विशेष म्हणजे या सर्व वृक्षांचे पुर्नरोपण करतांना सर्व वृक्ष हे 10 उंचीचे असावेत असा निर्णयही एकमताने या बैठकीत करण्यात आला.

शाळा, हॉस्पिटल, मॉल, सोसायटी मध्ये होणार स्पर्धा

सोसायटयांच्या मालमत्ता करातही सूट देण्याचा विचार

ठाणे महापालिका क्षेत्रात वृक्ष लागवड मोठया प्रमाणात व्हावी व वृक्ष संवर्धनही व्हावे या हेतूने पालिका क्षेत्रातील महापालिकांच्या शाळा, खाजगी शाळा, रुगणालये, मॉल, आणि हौसिंग सोसायटी व इतर यांच्यामध्ये स्पर्धा घेण्याच्या सुचना समिती सदस्य राहूल लोंढे यांनी यावेळी केली. तसेच या स्पर्धेत ज्या सोसायटी वृक्षलागवड व संवर्धन या मध्ये उल्लेखनीय कामगिरी करेल त्यांना मालमत्ता करात सुट देता येईल का अशी सूचनाही केली. यावेळी अशा प्रकारची स्पर्धा जर आयोजित झाली तर ख-या अर्थाने वृक्षांचे संवर्धन व लागवड होणार आहे त्यामुळे निश्चितच अशा प्रकारची स्पर्धा घेतली जाणार असून यामध्ये किती पारितोषिक दिले जाईल याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तसेच या स्पर्धेत सहभागी होणा-या सोसायटयांना किती प्रमाणात मालमत्ता करामध्ये सूट देता येऊ शकते याचा सखोल अभ्यास करुन त्या अनुषंगाने निश्चित प्रकारे पुढील कार्यवाही केली जाईल असे महा पालिका आयुक्त यांनी जाहीर केले.

विविध समित्यांचे गठण

वृक्ष प्राधिकरण समितीचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख आणि सुलभ होण्याच्यादृष्टीने महापालिका आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. जयस्वाल यांनी विविध समित्याची स्थापना केली आहे. यामध्ये न्यायालयीन पातळीवरील होणा-या निर्णयांचा अभ्यास करून त्यानुषंगाने धोरण ठरविण्यासाठी चंद्रहास तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठित करण्यात आली. प्रस्तावांना मंजुरी देण्याच्या अटी आणि शर्थींबाबत अभ्यास करण्यासाठी संतोष तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. तसेच वृक्षवल्ली प्रदर्शनाचे सुयोग्य पद्धतीने आयोजन करण्यासाठी पाच सदस्यांची समिती गठित करण्यात येवून यावर्षी13 ते 15 जानेवारी रोजी वृक्षवल्ली प्रदर्शन भरविण्याबाबत या बैठकीत निर्णय झाला.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email