शिवाजी महाराज चौकात भलामोठा कंटेनर उलटला
डोंबिवली – कल्याणच्या शिवाजी महाराज चौकात पुन्हा एकदा अपघात झालेला पाहायला मिळाला. भलामोठा लोखंडी पाईप वाहून नेणारा कंटेनर आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उलटला. त्यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही मात्र एका टू व्हीलरचे नुकसान झाले.
शिळफाट्याच्या दिशेला जाणारा हा कंटेनर चौकात वळण घेत असताना त्यावरील अजस्त्र लोखंडी पाईप निसटून खाली पडला आणि हा कंटेनर उलटला. सकाळी लवकर हा अपघात झाल्याने त्याठिकाणी फारशी वर्दळ नव्हती.अन्यथा हा अपघात अनेकांच्या जीवावर बेतला असता. वाहतूक पोलिसांकडून कंटेनर बाजूला हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान अवघ्या 2 दिवसांपूर्वी याच परिसरात बाईक घसरून झालेल्या अपघातात एका लहानग्याला आपला जीव गमवावा लागला होता. मुंब्रा बायपास दुरुस्तीसाठी बंद असल्याने अवजड वाहने कल्याणातून वळवण्यात आली आहेत. त्यामूळे आधीच गर्दी आणि ट्रॅफिक जॅमने वैतागलेल्या कल्याणकारांच्या त्रासात आणि चिंतेत आणखीनच भर पडली आहे.