कल्याण पश्चिमेतील पौर्णिमा चौक येथील अभिषेक हॉटेल मधुन बिअर बाटल्या चोरी व अन्य गुन्हे वृत्त
(श्रीराम कांदु )
कल्याण पश्चिमेतील पौर्णिमा चौक येथील अभिषेक हॉटेलचे शटर आणि गेट यामधील जागेत असलेल्या कोकाकोला आणि पेप्सी कंपनीच्या फ्रीजमध्ये ठेवण्यात आलेल्या 36 बिअरच्या बाटल्या चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी हॉटेल मेनेजर सतीश रघुनाथ जमधारे यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये सचिन शिरोडकर आणि त्याच्या दोन साथीदारांनी हि चोरी केल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
शॉक लागून कामगाराचा मृत्यू
कल्याणच्याखडकपाडा परिसरात असलेल्या एका सर्विस सेंटरमध्ये काम करणाऱ्या पवनकुमार हरिशंकर दुबे (18) या कामगाराचा इलेक्ट्रिक शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सर्विस सेंटर मालकाने कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना न करता निष्काळजीपणा केल्याप्रकरणी मृत मुलाचे वडील हरिशंकर दुबे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सर्विस सेंटर मालक सुभाष श्रीराम उपाध्याय यांच्या विरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
—————————————————————————————–
एकाला चाकूने भोसकून 3 लाखांना लुबाडले
कल्याण पूर्व विभागातील तिसगाव पाडा येथील बालाजी अपार्टमेंटमध्ये राहणारे वारिजा कोटियन हे सोमवारी दुपारी पुना लिंक रोडने जात होते. वाटेत आडोसा पाहून ते थांबले असता दोन अज्ञात इसम त्या ठिकाणी आले. त्यांनी जबरदस्तीने त्याच्या जवळील 3 लाख 1 हजार रोकड व एक मोबाईल असलेली पिशवी हिसकावली. त्यावेळी कोटियन यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता एकाने कोटियन यांच्या पोटात चाकू भोसकून त्यांना जखमी करून पसार झाले. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
————————————————————————————
मोटारसायकल चोरी
ठाकुर्ली पूर्वेतील खंबाळपाडा भागातील अंबर स्टार अपार्टमेंटमध्ये राहणारे वेणू गंगाराम बैरवेणी यांनी आपली हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल स्टेशन जवळ पार्क केली असता ती चोरीला गेली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारी नुसार डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षाची चोरी
आंबिवली येथील गणेश नगर मध्ये राहणारे विजय गबन राठोड यांनी आपली रिक्षा संजीवनी हॉस्पिटल मोहने येथे पार्क करून ठेवली असता ती तेथून चोरीला गेली आहे. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .
ऑनलाईन फसवणूक
कल्याणमधील वायलेनगर परिसरातील तुलसी पार्कमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला घरी असताना तिच्या मोबाईलवर एक कॉल आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने तरुणीच्या पुणे येथील सिटी बँक शाखेतील खात्याची आणि क्रेडीट कार्डाची माहिती विचारून घेतली. त्याआधारे तिच्या खात्यातील 18 हजार 888 रुपये परस्पर ट्रान्सफर करून फसवणूक केली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.