१२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा
लहान मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने अखेर कठोर पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्याहून परतल्यानंतर तातडीने केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेत चिमुकल्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याबाबत वटहुकूम काढण्यावर शिक्कामोर्तब केले.पोक्सो कायद्यात सुधारणा करून १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केल्यास आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केली जाणार आहे.
कठुआ, सुरत आणि आता इंदूर येथे अवघ्या ४ महिन्यांच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, लंडनच्या सेंट्रल हॉलमधील ‘भारत की बात सबके साथ’ या कार्यक्रमात जागतिक व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा घटनांवर चिंता व्यक्त केली होती. अशा घटना सहन केल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी बजावले होते. त्यानंतर पंतप्रधान मायदेशी परतताच त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन पोक्सो कायदयात महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे. यात १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार झाल्यास अशा गुन्ह्यातील आरोपीला थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद केली जाणार आहे.