११६ ठिकाणी गाळ काढणे, नाले रुंदीकरणाची कामे हाती घेणार
ठाणे जिल्ह्यातील गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार गेल्या वर्षीप्रमाणे यंदा देखील कंपन्या,संस्थांच्या मदतीने ११६ ठिकाणी गाळ काढणे, नाले रुंदीकरणाची कामे हाती घेणार
जागतिक जलदिनानिमित्त संकल्प
ठाणे – गेल्या वर्षी ठाणे जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत विविध कंपन्या आणि संस्थांच्या मदतीने जिल्हा प्रशासनाने ८० कामे करून १.७९ लाख घनमीटर गाळ काढण्याचे काम केले होते, यंदा या योजनेतच जिल्ह्यात विविध ठिकाणी ११६ कामे कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून घेण्यात येणार आहेत अशी माहिती आज नियोजन भवन सभागृहात जागतिक जलदिनाच्या कार्यक्रमात देण्यात आली. या कार्यक्रमास माजी आमदार दिगंबर विशे, उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, बा.भा.लोहार ,अधीक्षक अभियंता, सहायक आयुक्त उदयकुमार शिरुरकर, वसुंधरा संजीवनी मंडळाचे आनंद भागवत, उपस्थित होते.
यासंदर्भात जिल्ह्यातील लहान, मोठ्या कंपन्यांना जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी पत्र लिहिले असून त्यात आदिवासी क्षेत्रातील गावांमध्ये पाणी साठवण वाढेल असे तलाव ,बंधाऱ्यातील गाळ काढणे, नाला खोलीकरण,रुंदीकरण, छोटे बंधारे , रिचार्ज शाफ्ट, विहिरी नुतनीकरण ,दुरुस्तीकरण अशा स्वरुपाची कामे सीएसआरमधून करण्यात यावी असे सुचविले आहे.
या ११६ कामांमध्ये लघु पाटबंधारे विभागास गाळ काढण्याची ५० कामे, ग्रामीण पाणीपुरवठा (विहीर दुरुस्ती) अशी ३६ कामे, जलसंधारण विभाग (केटी बंधारे १०) आणि (छोटे बंधारे १०),भूजल सर्व्हेक्षण यंत्रणा ( रिचार्ज शाफ्ट १०) असे विभागनिहाय वाटप असून याव्यतिरिक्त कामांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असे उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी शहापूर,मुरबाड,भिवंडी या ग्रामीण भागात तसेच कल्याण, अंबरनाथ या शहरी तालुक्यातील ग्रामीण भागात जलयुक्त शिवार कामांसाठी एकूण ४४ गावे निवडण्यात आली असून यातील अनेक गावे आदिवासी क्षेत्रातील आहेत. २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवारसाठी २६ तर २०१६-१७ मध्ये १८ गावे निवडण्यात आली होती
कनकवीरा जिवंत झाली
याप्रसंगी बोलतांना आनंद भागवत यांनी शासनाच्या जोडीने सामाजिक संस्थांनी देखील भक्कमपणे उभे राहून अशा कार्यात योगदान दिले पाहिजे असे सांगितले. मुरबाड येथील लुप्त झालेल्या कनकवीरा नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी संस्थेने प्रयतन केले आणि त्याची परिणिती म्हणून ही नदी पहिल्या टप्प्यात गाळमुक्त होत असून पाणी देखील वाहू लागले आहे. असे सांगीतले. कंटूर बडींगच्या माध्यमातून भूगर्भातील जलसाठा वाढू शकतो असेही ते म्हणाले.
उदयकुमार शिरुरकर म्हणाले की, रेन वॉटर हार्वेस्टिंगवर भर दिला पाहिजे. पाण्याची निर्मित्ती करता येत नाही पण पाण्याची बचत आपण करू शकतो. बा.भा.लोहार म्हणाले की, ठाणे पाटबंधारे विभागाने जल जागृती सप्ताहात विविध कार्यक्रम, स्पर्धा, पथनाट्ये, जलरथ या माध्यमातून जनजागृती केली आणि नागरिकांचे प्रश्न व समस्या समजावून घेतल्या. पाण्याचे रिसायकलिंग केल्यास पाण्याचा नाश थांबेल. बा.भा.लोहार यांनी देखील आपले विचार मांडले. कार्यकारी अभियंता उमेशचंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले.