१० लाख लोकवस्तीला अवघे २५ पोलीस
डोंबिवली दि.०२ – कायदा आणि सुव्यस्थेत शिस्त असणे अपेक्षित असूनही परिस्थिती अतिशय वाईट आहे. विशेष म्हणजे रिक्षा चालकांच्या बेशिस्त कारभारामुळे आता येथील करदात्या नागरिकांबरोबर वाहतूक वरिष्ठ पोलिसही हतबल झाले आहेत.
शहरात वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पूर्व-पश्चिम विभागात चौकाचौकात गर्दीच्या वेळी कोंडी होत असून वाहतूक पोलिसांच्या नियंत्रणावर ताशेरे ओढले जात आहते. पूर्व विभागात इंदिरा चौक, टंडन चौक, चाररस्ता चौक, टिळकनगर चौक, मानपाडा चौक, शेलार नाका, दत्तनगर चौक, घरडा सर्कल, ठाकुर्ली चौक तर पश्चिमेला दिनदयाळ चौक, फुले चौक, उड्डाणपूल, हॉटेल द्वारका चौक, सुभाष रोड चौक, जोंधळे-स्वामी शाळा चौक, गोपी चौक, गणेशनगर चौक आदी ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना जवळ-जवळ एक-दोन तासांचा कालावधी व्यर्थ खर्ची होत आहे.
शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस नियंत्रण सेवा असून त्यासाठी कर्मचारी संख्या अतिशय अल्प अशीच आहे.
डोंबिवली शहराची लोकसंख्या सुमारे दहा लाख पर्यंत पोहचली असून अशा लोकसंख्येच्या वाहतूक नियंत्रणासाठी केवळ 25 वाहतूक कर्मचारी आणि 14 वाहतूक सेवक आहेत. शहरात स्कूलबसेस, अवजड वाहने, चारचाकी, दोन चाकी आणि रिक्षा यांची गणती न केलेलीच बरी अशी स्थिती आहे. रस्त्यांच्या चौका-चौकात आणि गल्ली-बोळात रिक्षांचे थांबे असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. प्रमाणाच्या बाहेर शासनाने रिक्षा परवाने बहाल केल्यामुळे दिवसगणिक सुमारे 25 नवीन रिक्षा शहरातील रस्त्यांवर धावत आहेत. परिणामी रिक्षा चालकांच्या बेशिस्त कारभारामुळे वाहतूक कोंडीत भर पडल्याची कबुली खुद्द आरटीओ आणि वाहतूक पोलीस देत असतात.
शहरातील वाहतूक कोंडीबाबत नुकताच पदभार स्वीकारलेले वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश जाधव हे डोंबिवली शहरातील सद्य परीस्थितीबाबत हतबल असून सध्या फक्त ते पहाणीच करीत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी संख्या अतिशय अल्प असून अधिक कर्माचाऱ्यांची मागणी केली आहे. जे कर्मचारी आहेत त्यामधील सुमारे 5 ते 6 कर्मच्यारी सतत गैरहजर असल्याने वाहतुक नियंत्रण करणे अतिशय त्रासदायक ठरत आहे.