होळ शिवारात शिवशाही बसला अपघात; सहा जखमी
केज – लातूरहून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस अंबाजोगाई – केज रोडवरील होळ जवळ पलटी होऊन झालेल्या अपघातात सहा प्रवाशी जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास झाला. राज्यात अलिशान शिवशाही बसला झालेला हा पहिलाच अपघात आहे.
सध्या लोखंडी सावरगावपासून मांजरसुंबा पर्यंत महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा होत असून लहान-मोठ्या अपघातांचे सत्र सातत्याने सुरू आहे. पहाटे लातूर येथून औरंगाबादकडे निघालेली शिवशाही बस (एमएच ०९ ईएम २४६८) होळच्या पुढे आल्यानंतर समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवताना अरुंद रस्त्याच्या खाली उतरल्याने पलटी झाली. या अपघातात बसचालक भागवत दादाराव केंद्रे (वय २६, रा. उंडेगाव), रेणुका कल्याण माळी (वय ३०, माळी चिंचोली) आणि अमर जियाउद्दीन सिद्दिकी (वय ९, लातूर) हे तिघे गंभीर जखमी झाले तर पांडुरंग भीमराव म्हेत्रे (वय ५६, केज), राजू सानुजी इवले (वय २६, औरंगाबाद) आणि सतिश गणपत गव्हाणे (वय ३०, बोरगाव) हे जखमी झाले आहेत.सर्व जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. बसमध्ये प्रवाश्यांची कमी संख्या आणि बसचा वेग कमी असल्याने मोठी हानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेत रुग्ण पोहोंचण्यापूर्वीच डॉक्टरांना बोलावून घेऊन सर्व यंत्रणा तयार ठेवली होती. स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, डॉ. राकेश जाधव, डॉ. कचरे यांनी स्वतः उपस्थित राहून जखमींच्या उपचारांवर लक्ष दिले.