हुंड्यासाठी विवाहितेला पेटविले; प्रकृती अतिचिंताजनक
गेवराई दि.२६ – आठ दिवसापूर्वीच हुंड्याची रक्कम दिल्यानंतरही निर्दयी पती, सासू आणि सासऱ्याने विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची घटना गेवराई तालुक्यातील कुंभेजळगाव येथे मंगळवारी घडली. यामध्ये सदर विवाहिता ९८ टक्के भाजली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
वैशाली विजय राठोड (वय २१) असे या जळीत विवाहितेचे नाव आहे. चार वर्षापूर्वी तिचे लग्न कुंभेजळगाव येथील विजय गुलाब राठोड याच्यासोबत झाले होते. या दांपत्याला विराज आणि विरांजली अशी दोन अपत्ये आहेत. विवाहानंतर वैशालीचा हुंड्यासाठी सातत्याने छळ करण्यात येऊ लागला. त्यामुळे माहेरकडील लोकांनी आठ दिवसापूर्वीच काही रक्कम हुंडा स्वरुपात वैशालीच्या सासरी दिली होती असे समजते. त्यानंतरही वैशालीचा छळ थांबला नाही. अखेर शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पती विजय राठोड, सासू पारूबाई राठोड आणि सासरा गुलाब जेसु राठोड या तिघांनी वैशालीला घरात कोंडून तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले आणि बाहेरून कडी लावून निघून गेले.
या घटनेत वैशाली ९८ टक्के भाजली असून गंभीर अवस्थेत तिला गावातील इतर लोकांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या वैशालीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती अतिचिंताजनक आहे.
दरम्यान, वैशालीच्या जबाबावरून तिचा पती, सासू आणि सासऱ्यावर कलम ३०७, ४९८-अ, ३४ अन्वये चकलांबा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून सर्व आरोपी फरार झाले आहेत.