हुंड्यासाठी छळ; पतीला तत्काळ अटक होणार
नवी दिल्ली – हुंडयासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणात पती आणि त्याच्या कुटुंबीयांना तात्काळ अटक होऊ शकते असा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी दिलेला आपला निर्णय बदलला. दरम्यान, आरोपीला अंतरिम जामिनाची मुभाही देण्यात आली आहे. गेल्या वर्षी राजेश शर्माविरुद्ध उत्तर प्रदेश सरकार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दोनसदस्यीय खंडपीठाने हुंडयासाठी छळ प्रकरणात पती आणि त्याच्या कुटुंबीयांना तत्काळ अटक करता येणार नाही, असा निर्णय दिला होता.
मात्र सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह तीन न्यायमूर्तींच्या पीठाने या निर्णयावर असहमती दर्शविली आणि फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कलम ४९८ अ बाबत पुन्हा सुनावणी झाली. आधीचा निर्णय बदलून हुंडय़ासाठी छळ प्रकरणात पती आणि त्याच्या कुटुंबीयांना अटक करता येईल, असे आदेश दिले. ४९८ अ या कलमातील तरतुदी शिथिल करणे हे कायद्यानुसार पीडित महिलेच्या अधिकाराविरोधात आहे असे सरन्यायाधीश मिश्रा यांनी स्पष्ट केले.
कायद्याच्या दुरुपयोगाची चिंता व्यक्त केली होती
कलम ४९८ अ नुसार हुंडाप्रकरणी थेट अटक करता येणार नाही असा निर्णय गेल्या वर्षी देताना दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने कायद्याचा दुरुपयोग होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. तसेच हुंडय़ासाठी छळ प्रकरणांमध्ये पडताळणीसाठी प्रत्येक जिह्यात एक कुटुंब कल्याण समिती नियुक्त करावी. या समितीचा अहवाल आल्यानंतरच अटकेचा निर्णय द्यावा, असे आदेश दिले होते.