हिंदु धर्मजागृती सभेला एकवटलेल्या हजारो भिवंडीवासियांचा हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत होण्याचा निर्धार !

जातीपातीमध्ये लढणे सोडून अखंड हिंदु राष्ट्रासाठी संघटीत व्हा ! – आमदार राजासिंह ठाकूर

(श्रीराम कांदु)

भिवंडी (ठाणे) – हिंदु राष्ट्र हा आपला गौरव आहे. दलितांना सोडून अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकत नाही. एम्आयएम् सारखा धर्मांध पक्ष युवकांना भडकवण्याचे काम करत आहे. जातीपातीचे राजकारण करून अखंड हिंदुस्थानाला तोडण्याचा प्रयत्न होत आहे. माझे समस्त हिंदु बांधवांना आवाहन आहे की, जातीपातीमध्ये लढणे सोडून अखंड हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हा, असे आवाहन भाग्यनगर (हैदराबाद) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार आणि गोरक्षक श्री. टी. राजासिंह यांनी 28 जानेवारी या दिवशी भिवंडी येथील काटेकर मैदानावर झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेत केले. या वेळी व्यासपिठावर हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके, सनातनच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर उपस्थित होत्या. व्यासपिठावर उपस्थित वक्त्यांनी समस्त हिंदू बांधवांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हाक दिली. या आवाहनाला प्रतिसाद देत ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम्’ चा जयघोष करत उपस्थित हिंदू बांधवांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृतीप्रवण होण्याचा निर्धार केला. या सभेला प.पू. गंभीरानंद सरस्वती महाराज, सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. भाजपचे खासदार श्री. कपिल पाटील, नगरसेवक श्री. नीलेश चौधरी, नगरसेवक श्री. सुमित पाटील, श्री. किसन कल्याणपूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. संतोष शेट्टी यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी आमदार श्री. राजासिंह ठाकूर म्हणाले, ‘‘मुंबईमधील काही भागांतील महाविद्यालयांमध्ये लव्ह जिहादचे षड्यंत्र चालू आहे. धर्मांध हिंदू युवतींचा भ्रमणभाष क्रमांक घेऊन त्यांना ‘वॉट्स अ‍ॅप’वर संदेश पाठवतात. हिंदू युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचा उपभोग घेतात. जोपर्यंत त्यांना धर्मांधाचे खरे स्वरूप समजते, तोपर्यंत हिंदू ुयुवतींचे जीवन उध्वस्त झालेले असते. मुगल सत्तेच्या काळात शेकडो हिंदू युवतींना मुगल राज्यकर्ते त्यांच्या जनानखाण्यात डांबून ठेवत. आताही तीच स्थिती आहे, केवळ धर्मांधांची नीती पालटली आहे. तेव्हा जनानखाणा होता, आता लव्ह जिहाद चालू आहे. भिंवडीमध्ये काही भागामध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात काढण्यात येणार्‍या मिरवणुकीमध्ये मूर्तीला धोका निर्माण केला जातो. काही ठिकाणी हिंदूंच्या मृतदेहावर अग्निसंस्काराला प्रदूषणाच्या नावाखाली धर्मांधांकडून विरोध केला जात आहे. हा भारत आहे की पाकिस्तान आहे ? असा माझा प्रश्‍न आहे. हिंदु युवकांनी या धर्मावरील आघातांचा विचार करायला हवा. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांची आहे. हिंदू युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध व्हावे.’’

 

*भाजपच्या राज्यातही हिंदूंच्या मंदिरांचा पैसा अहिंदूंना वाटला जाणे सर्वथैव अनुचित !  अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदू विधीज्ञ परिषद*

पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गोशाळेतील गायींना खाण्यासाठी पुरेसे खाद्य दिले जात नसल्यामुळे कचर्‍यात मिसळलेले प्लास्टीक खाऊन गाईचा मृत्यू झाला, दुसर्‍या गायीचा मृत्यू पोटात तार अडकून झाला. हे हिंदू विधीज्ञ परिषदेने जनतेसमोर आणले. हिंदू विधीज्ञ परिषदेच्या लढ्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला त्याची 350 एकर भूमी परत मिळवून देता आली. कोल्हापूरच्या 3 हजार 67  मंदिरांची ‘सीआयडी’ चौकशी चालू झाली आहे; परंतु हा लढा अजून पुष्कळ मोठा आहे. शासनाने नेमलेल्या विश्‍वस्तांना हाकलून द्यावे, यासाठी हिंदू विधीज्ञ परिषद सध्या न्यायालयीन लढा देत आहे. महाराष्ट्राची कुलदेवता मानली जाणारी आणि छत्रपती शिवराय यांची आराध्यदेवता तुळजाभवानी मंदिरालाही भ्रष्टाचार्‍यांनी सोडले नव्हते. भवानी मंदिरांची भूमी हडपली गेली आहे, हे प्रकाशात येताच त्याची चौकशी करण्याचे एक नाटक केले गेले आणि अहवाल दाबून ठेवण्यात आला. ही गोष्ट हिंदू विधीज्ञ परिषदेने उघड करत हा अहवाल जाहीर करून त्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर, म्हणजेच औरंगाबाद खंडपिठासमोर याचिका दाखल केली. सिद्धीविनायक मंदिरातील निधी मुसलमानांना कसा दिला जात आहे, हे हिंदू विधिज्ञ परिषदेने पुराव्यांनिशी जनतेसमोर मांडले. मंदिरांचे सरकारीकरण झाले की मंदिरांची अशी दुरावस्था होते. असे असतांना भाजपच्या राज्यातही हिंदूंच्या मंदिरांचा पैसा अहिंदूंना वाटला जावा, हे सर्वथैव अनुचित आहे.

 

*……. तरीही सनातन हिंदु धमहिताचे कार्य करतच राहिल !  सौ. नयना भगत, प्रवक्ता, सनातन संस्था*

हिंदु राष्ट्राला विरोध करणारे आणि त्याचा पुरस्कार करणारे, असे दोन मतप्रवाह सध्या समाजात आहेत. समाजातील एक मोठा घटक पूर्वांपार संस्कृतीनुसार भारत पुन्हा हिंदु राष्ट्र व्हावा, या मताचा आहे. हिंदु धर्म नष्ट करू पहाणार्‍या आक्रमकांचे वंशज आणि गुलामगिरीची मानसिकता बाळगणारे जन्महिंदू हे दुसर्‍या गटातील लोक जिवाच्या आकांताने हिंदुत्वाला आणि हिंदु राष्ट्र या संकल्पनेला विरोध करत आहेत. हिंदुत्वाची शक्ती निष्प्रभ व्हावी, यासाठी ही मंडळी समाजाचा बुद्धीभेद करून हिंदुत्वाची मानहानी करत आहेत. सनातन संस्था मागील 8 वर्षांपासून हिंदु विरोधकांच्या अशाच कारवायांमुळे पीडित आहे.  सध्या स्वत:ला पुरोगामी म्हणवणारे काही अविचारवंत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांच्या प्रकरणांत सनातनला दोषी ठरवत आहेत. हिंदु धर्म हा सत्यावर आधारित आहे. त्यामुळे सत्याचाच विजय होणार या धर्मतत्त्वावर आमची श्रद्धा आहे. सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड यांना 18 महिने कारागृहात ठेवूनही पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. अखेरीस न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्त केले; पण पोलीस पानसरे हत्या प्रकरणातील त्यांच्यावरील खटला अद्यापही चालू देत नाही. बांधवांनो, सनातनवर आतापर्यंत अनेक संकटे आली; पण त्यावर मात करून विरोधाला न डगमगता सनातन मागील 25 वर्षांपासून हिंदु धर्माच्या हिताचे कार्य करत आहे. अशी कितीही संकटे आली तरी सनातन हिंदु धमहिताचे कार्य करतच राहिल.

 

*माता-भगिनी यांना आम्ही निःशुल्क स्वसंरक्षण प्रशिक्षण उपलब्ध करून देऊ !  सौ. क्षिप्रा जुवेकर, रणरागिणी शाखा*

देव, देश आणि धर्म यांसाठी शौर्य गाजवण्याची भारतियांमध्ये कमतरता नाही; मात्र त्यांना शौर्यहीन, म्हणजेच षंढ बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. आतंकवाद म्हणजे केवळ स्फोट किंवा हत्या हा प्रकार आता मागे पडला आहे. धर्मांधांकडून ‘लॅण्ड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, ‘फतवा जिहाद’, ‘फिल्म जिहाद’, ‘सेक्स जिहाद (जिहाद-अल्-निकाह)’ यांसारखे 14 प्रकारचे जिहाद केले जात आहेत. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर कायदे कडक झाले; मात्र दुष्कृत्ये चालूच राहिली. देशात प्रत्येक 14 मिनिटांनी एक बलात्कार आणि प्रत्येक 24 मिनिटांनी एका महिलेचा लैंगिक छळ होतो, ही शासनाची अधिकृत आकडेवारी आहे. राज्यघटनेने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांमध्ये स्वतःच्या जिवाचे रक्षण करण्याचा अधिकार दिला आहे. बंधूंनो, कायद्याने दिलेला हा अधिकार कायदाबाह्य वर्तन करून आपल्याला छळणार्‍या पोलिसांच्या विरोधातही वापरता येऊ शकतो. प्रतिकारक्षमता निर्माण होण्यासाठी आपण स्वसंरक्षण शिकले पाहिजे. ‘हिंदु धर्मात महिलांना गौण स्थान आहे’, अशी ओरड कथित पुरोगामी करतात. त्यांना मी आज सांगते की, वेदकाळात आमच्या महिला राज्यांचे नेतृत्व करायच्या, असा उल्लेख यजुर्वेदात आहे. आमच्याकडे धनाची देवता लक्ष्मी आणि स्वयंपाकघरात पूजली जाणारी अन्नपूर्णा आहेच; पण त्याचबरोबर दुष्टांचा संहार करणारी दुर्गा, डाकिणी, शाकिनी, चंडी यासुद्धा आहेत. देवीच्या या मारक रूपांची धारणा करण्यासाठीच आम्ही हिंदु जनजागृती समितीची ‘रणरागिणी शाखा’ चालू केली आहे. आज मी रणरागिणी शाखेच्या वतीने जाहीर करते की, आम्ही आपल्या भागातील माता-भगिनींना निःशुल्क स्वसंरक्षण प्रशिक्षण उपलब्ध करून देऊ.

 

*तन-मन-धन अर्पण करून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा !  प्रसाद वडके-हिंदु जनजागृती समिती*

हिंदु जनजागृती समिती ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’चे ध्येय घेऊन कार्यरत आहे. भारताची धर्माच्या आधारे फाळणी होऊनही काँग्रेसी राज्यकर्त्यांनी हिंदुबहूल भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याऐवजी ‘सेक्युलर’ म्हणजेच ‘धर्मनिरपेक्ष’ बनवण्याचे षडयंत्रच रचले. ध्वनीप्रदूषणाचा कायदा असतांना पोलिसांना मशिदींतील पहाटेच्या वेळी दिली जाणारी बांग का ऐकू येत नाही ? आजही केवळ नवरात्र आणि गणेशोत्सव या हिंदूंच्या उत्सवांच्याच काळात ध्वनीप्रदूषणाची चर्चा का केली जाते ? मागील 70 वर्षे ‘देशाचा विकास करू’, असे सांगून विविध राजकीय पक्षांनी राज्य केले; मात्र आजपर्यंत देशातील दारिद्य्र, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्या सुटल्या का ? आजही जनतेला साध्या-साध्या गोष्टींसाठी आंदोलन करावे लागते. आता नुसत्या समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हानी करणार्‍या घटनांच्या बातम्या वाचून किंवा ऐकून त्या विसरून जाऊ नका. प्राचीनकाळापासून भारतमातेला असलेले महत्त्व पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात तन-मन-धनाने सहभागी व्हा !

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email