हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यास नकार, नवरदेवाच्या मित्रावर दारूच्या बाटलीने हल्ला
पनवेल – हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यास नकार देणा-या नवरदेवाच्या मित्रावर दारूच्या बाटलीने हल्ला केल्याची घटना नुकतीच पनवेलच्या खालचा ओवळा गावात घडली.याप्रकरणी नवरदेवाच्या चुलत्यावर मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबद्दल अधिक वृत्त असे की,६ मे रोजी भूषण कोळी (२२) हे त्यांचा मित्र अतुल गायकवाड याच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचत होते. ते थकल्याने बाजूला बसले त्यावेळी अतुलचा चुलता सुखदेव गायकवाड याने दारूच्या नशेत भूषण आणि त्याच्या मित्रांना नाचण्यास सांगितले. मात्र त्यांनी नकार दिल्याने सुखदेव यांनी शिवीगाळ करत भूषणच्या कानफटात मारून हातातील बाटली नाकावर जोराने मारली. त्यानंतर भूषणने रुग्णालयात धाव घेतली. त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे भूषणने सहा दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.