सोन्याचे दागिने घेऊन कारागीर पसार, साडेसहा लाखांचा व्यापाऱ्यांना चुना
उल्हासनगर:- शहरातील २ व्यापाऱ्यांना कारागिराने साडेसहा लाख रुपयांचा चुना लावला आहे. हा कारागीर व्यापाऱ्यांचे सिंधी सोन्याचे दागिने घेऊन पसार झाल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. मिथून दास असे फरार आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार व्यापारी सुशील रिजवाणी (४९) व मोहित वलेच्छा हे दोघे सोनार गल्लीमधील दयालदास इमारतीमध्ये गेले. तिथे सोन्याच्या तयार दागिन्यांना स्टोन सेटींगचे काम करणारा मिथून दास (३०) याला त्यांनी सिंधी सोन्याचे दागिने विश्वासाने दिले. हे दागिने ६ लाख ५० हजार रुपये किंमतीचे, २२ कॅरेटचे तर त्यांचे वजन २१५ ग्रॅम होते.
कारागीर मिथून याने दागिन्यांना स्टोन सेटींग न करता ते दागिने घेऊन तो पळून गेला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सुशील रिजवाणी यांनी तक्रार दिली. आरोपी मिथून दास याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पी. पी. चौधरी करीत आहेत.