सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 15 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींनी केले संबोधित
नवी दिल्ली, दि.२३ – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज पुण्यात सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या 15 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले. शतकानुशतके भारत अध्ययनाचे केंद्र होता, ही बाब आपल्यासाठी अभिमानाची आहे. उपखंडातल्या तक्षशीला ते नालंदा अशा प्राचीन विद्यापीठांनी आशिया आणि त्या पलीकडील विद्यार्थ्यांनाही आकर्षित केले होते, असे राष्ट्रपतींनी सांगितले. आधुनिक काळातही आपल्या क्षैक्षणिक संस्था विविध देशातल्या विशेषतः शेजारी देश आणि आपले मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या आफ्रिका खंडातल्या देशांसाठी ज्ञानाची कवाडे खुली करत आहेत, असे राष्ट्रपती म्हणाले.
देशातील विविध महाविद्यालये, विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये 166 देशातले 46,144 परदेशी विद्यार्थी शिकत आहेत. यात सिम्बॉयसिस महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. एक हजारांहून अधिक परदेशी विद्यार्थी सिम्बॉयसिसमध्ये शिकत असून त्यापैकी 33 देशांमधल्या 329 विद्यार्थ्यांना आज पदवी मिळत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
भारतात 903 विद्यापीठे आणि 39,050 महाविद्यालयांचे जाळे आहे. मात्र जागतिक क्रमवारीत ती मागे असल्याबद्दल राष्ट्रपतींनी खंत व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर सरकारने पावले उचलली असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.