सामाजिक संस्थाच्या विश्वस्तांनी आधुनिकतेची कास धरावी
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – सामाजिक संस्थांच्या विश्वस्तांनी चाकोरीबाहेर येऊन आधुनिकतेची कास धरून काम करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी, डोंबिवली येथे व्यक्त केले. डोंबिवलीतील गणेशमंदिर संस्थान, टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, श्रीलक्ष्मीनारायण संस्था आणि शबरी सेवा समिति यांच्या संयुक्त विद्यनाने आयोजित करण्यात आलेल्या “धर्मादाय आयुक्त विश्वस्तांच्या भेटीला” या कार्यक्रमात शिवकुमार डिगे बोलत होते.
धर्मादाय आयुक्त, सहाय्यक धर्मादाय आयुक्त तसेच कार्यालयातील कर्मचारी आणि विविध कामासाठी येणारे विश्वस्त यांच्यातील सुसंवाद अधिक वाढावा आणि समस्यांचे निराकरण त्वरित व्हावे या साठी आगामी काळात महिन्याच्या १ल्या किंवा ३ ऱ्या शनिवारी या पैकी एका दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक धर्मादाय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिनाच्या धरतीवर ‘विश्वस्त दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल अशी माहिती डिगे यांनी दिली. तसेच “मागील २ महिन्यात राबवलेल्या “झीरो पेंडन्सी” विशेष अभियानाच्या अंतर्गत राज्यांतील तब्बल ३८००० “बदल अर्ज” योग्यप्रकारे निकालांत काढण्यात आले आहेत तसेच आगामी काळात राज्यांतील नोंदणी झालेल्या सर्व न्यासांची माहिती ऑनलाईन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे” अशी माहिती देखील . डिगे यांनी विश्वस्तांना दिली.तसेच धर्मादाय आयुक्त शेतकरी आत्महत्याग्रस्त विभागातील गरीब कुटुंबातील मुला – मुलींच्या सामुहिक विवाह कार्यक्रम आयोजनात धर्मादाय कार्यालयांनी जिल्हा निहाय पुढाकार घेऊन करत असलेल्या विविध कामांची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमात धर्मादाय आयुक्त कार्यालय ठाणे येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त सौ.संगीता वनकोरे, निरीक्षक . अशोक उंबरे यांनी विश्वस्त कायद्या संबंधित असलेले विषय तसेच धर्मादाय आयुक्त मुंबई कार्यालयातील सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्र.अ.जगदाळे यांनी आपल्या सत्रांत अकाऊंट, ऑडीट डिजिटलायझेशन या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.तसेच विश्वस्तांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना . डिगे यांनी तपशीलवार उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.