सात मजली अनधिकृत इमारतीवरील कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच

कडोंमपाचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत ८ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
  जाळ्यात

 कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यासह दोन लिपिकांना आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ग्रामीण भागातील अनधिकृत इमारतीवर कारवाई न करण्यासाठी लाच मागण्यात आली होती. या घटनेने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

महापालिकेच्या हद्दीतील २७ गावातील एका सात माजली अनधिकृत इमारतीवर कारवाई करू नये यासाठी संजय घरत (५१) यांच्यासह ललित दशरथ आमरे (४२, लिपिक), भूषण बळीराम पाटील (२७, लिपिक) यांनी सदर विकासकाकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती ३५ लाख रुपये देण्याचे सदर विकासकाने मान्य केले. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ८ लाख रुपये स्वीकारताना घरत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज त्यांच्या कार्यालयात रंगेहाथ पकडले.

 

यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आवारातील घरत यांच्या इनोव्हा गाडीची तसेच अन्य एका खाजगी गाडीची देखील कसून झडती घेतली. दरम्यानघरत यांच्या निवासस्थानीही तपासासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एक पथक रवाना झाल्याचे समजते. याप्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दीपक दळवी हे करीत आहेत.

 

नेहमी चर्चेत राहिलेले आणि वादग्रस्त अधिकारी अशी प्रतिमा असणाऱ्या घरत यांना पकडल्याची बातमीपसरताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावेळी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये व आवारातमोठी गर्दी झाली होती.

 

पेढे वाटत त्यानेव्यक्त केला आनंद…

महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या चौदा दिवसांपासून डोंबिवली शहरातील अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा चालविला होता. मात्र त्याला सबंधित अधिकारी दाद देत नसल्याने कल्पेश जोशी नामक तरुणाने महापालिकेसमोर निषेध आंदोलन सुरु केले होते. घरत यांना लाच घेताना पकडल्याची बातमी कळताच जोशी याने नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यापुढे तरी मी केलेल्या तक्रारीशी सबंधित इमारतींवर आयुक्त बोडके कारवाई करतील अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. आपले आंदोलन यापुढेही सुरु राहील असे त्याने यावेळी सूचित केले.

राज्यमंत्र्याशी जवळीक…

 

अतिरिक्त आयुक्त संजय घरत हे एक ऐटबाज अधिकारी म्हणून महापालिका वर्तुळात चर्चेत असायचे. त्यांची मंत्रालयापर्यंत पोचअसल्याच्या खमंग चर्चा  महापालिका वर्तुळात नेहेमी रंगत असे. त्याचप्रमाणे ते एका राज्यमंत्र्याच्या जवळचे असल्याचे मानले जातात. असे असतानाही त्यांच्यावर आजची कारवाई झाल्याने पालिका वर्तुळातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.