साक्षात ‘देवा’ची भेट

मराठी भावगीतांच्या इतिहासात ज्यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही आणि मराठी भावसंगीतावर ज्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला व आपल्या अविट चालींनी मराठी रसिकांना भरभरुन आनंद दिला ते ज्येष्ठ संगीतकार पं. यशवंत देव यांची झालेली भेट व गप्पा अविस्मरणीय ठरल्या.

लोकसत्ता-रविवार वृत्तान्तमधील ‘भावगीताची नव्वदी’या लेखाच्या निमित्ताने देवांना दूरध्वनी केला, येण्याचा उद्देश सांगितला आणि भेटीची वेळ मागितली. देवांनी या म्हणून सांगितले आणि ठरलेल्या वेळी देवांच्या घरी पोहोचलो.
देव आता नव्वदीच्या घरात आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये त्यांना ९१ वर्षे पूर्ण होतील.

सुहास्य वदनाने त्यांनी स्वागत केले. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी ‘मला आता वयोमानानुसार कधी कधी काही आठवत नाही, विसरायला होते’ असे सांगून दिलगिरी व्यक्त केली. त्यावर जसे आठवेल तसे सांगा, त्रास होईल इतका स्मरणशक्तीला ताण देऊ नका, असे मी त्यांना म्हटले. पण अर्ध्या-पाऊणतसांच्या गप्पांमध्ये क्वचितच अशी वेळ आली की देवांना एखादे नाव किंवा बाब आठवली नाही. संदर्भ व आठवणी त्यांच्या ओठावर होत्या.

वयोमानानुसार विस्मरण होते हे लक्षात घेऊन त्यांनी काही पु्स्तके, त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, त्यांच्याकडे ज्या गायकांनी गाणी गायली त्याची यादी असे काही संदर्भ तयार ठेवले होते. आकाशवाणी केंद्राच्या धारवाड, नागपूर व मुंबई सुगम संगीत विभागात केलेली तीस वर्षांची दीर्घ सेवा माझ्या आयुष्यात मोलाची ठरली. त्या नोकरीत आपल्याला खूप काही मिळाले, थोरामोठयांचा सहवास लाभला आणि ‘भावसरगम’सारख्या कार्यक्रमातून अनेक उत्तमोत्तम मराठी भावगीते श्रोत्यांपर्यंत पोहोचविता आली याचा आनंद व समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

देव यांनी संगीतकार म्हणून अशी अनेक अविस्मरणीय गाणी दिलीच पण गीतकार/कवी म्हणूनही त्यांनी लिहिलेली अरे देवा तुझी मुले, कोटी कोटी रुपे तुझी, जीवनात ही घडी अशीच राहू दे, तू नजरेने हो म्हटले, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, स्वर आले दुरुनी अशी अजरामर व आजही रसिकांच्या ओठावर असणारी गाणी दिली आहेत. गप्पांच्या वेळी त्या विषयीही ते बोलले. ‘स्वर आले दुरुनी’ हे गाणे कसे सुचले व या गाण्यात तीन संगीतकार वेगवेगळ्या स्वरुपात (या गाण्याचे गीतकार-देव, गायक-सुधीर फडके आणि संगीत-प्रभाकर जोग) कसे एकत्र आले त्याची तसेच आपण तेव्हा नागपूर आकाशवाणीवर नोकरीला होतो व जोग मुंबईत होते. त्यांनी मुंबईहून इनलॅण्ड लेटरवर पाठवलेली गाण्याची चाल/नोटेशन आणि ते स्वर दुरुन आले म्हणून त्यावर सुचलेली ‘स्वर आले दुरुनी’ ही ओळ व पुढे तयार झालेल्या ‘स्वर आले दुरुनी’ हे गाणे याचीही आठवण सांगितली.

विविध संस्थांकडून मिळालेले २५ हून अधिक पुरस्कार, १५ चित्रपटांचे संगीतकार, ४३ नाटकांसाठी गीत व संगीत दिग्दर्शन, ४५ ध्वनिफीती, आल्बम यांना संगीत असे भरीव योगदान देव यांनी मराठी संगीताला दिले आहे. आयुष्याच्या या वळणावर देव समाधानी व तृप्त आहेत. गप्पा आवरत्या घेतांना त्यांनी निर्मिती केलेल्या एका रागाची झलक तसेच तराणा गाऊन दाखवला. निघताना मी त्यांना वाकून नमस्कार केला व तुम्ही वेळ दिलात आणि बोललात या बद्दल मलाही खूप छान वाटले, असे म्हटले. त्यावर देवांनी हलके स्मितहास्य करुन या पुन्हा गप्पा मारायला’ असे आवर्जून सांगितले.

आता तो योग पुन्हा कधीच येणार नाही. पं. यशवंत देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email