सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अचूक शहाणपण, संवेदनशीलता आणि डावपेचात्मक कौशल्यामुळे आज भारतीय एकसंध – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरुन 49 व्या मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. सरदार वल्लभभाई पटेल यांचे अचूक शहाणपण, संवेदनशीलता आणि डावपेचात्मक कौशल्य यामुळे सारे भारतीय एका माळेत गुंफले गेले, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2018 रोजी संपूर्ण भारत त्यांना आदरांजली अर्पण करेल. गुजरात राज्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच ठरणारा गगनचुंबी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा पुतळा पटेल यांच्या जयंतीदिनी देशाला अर्पण केला जाईल आणि तिच त्यांना सर्वोत्तम आदरांजली ठरेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ‘रन फॉर युनिटी’ मध्ये लोकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

भारतीय क्रीडा क्षेत्रात प्रत्येक दिवशी नवनवीन सुधारणा दिसून येत असून, केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर आतापर्यंत अज्ञात असलेल्या क्षेत्रातही भारत नवीन विक्रम रचत आहे, असे ते म्हणाले. शक्ती, कौशल्य आणि कुवत हे क्रीडा क्षेत्रासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून, देशातील तरुणांनी हे गुण आत्मसात केले, तर केवळ आर्थिक, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही देशासाठी नवनवीन किर्तीमान प्रस्थापित होतील, असे ते म्हणाले. 2018 च्या ‘समर युथ ऑलंपिक’ मधील भारतीय युवकांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.

गेल्यावर्षी भारताने 17 वर्षाखालील फिफा जागतिक चषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते, असे सांगून यावर्षी भुवनेश्वर इथे जागतिक हॉकी चषक स्पर्धा 2018 चे आयोजन करण्यात येत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. हॉकीमध्ये भारताचा दैदिप्यमान इतिहास असून, भारताने मेजर ध्यानचंद यांच्या सारखे अलौकीक खेळाडू जगाला दिले असल्याचे ते म्हणाले. लोकांनी मोठ्या संख्येने भुवनेश्वर इथे येऊन भारतीय तसेच इतर संघाना प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

‘सेवा हिच सर्वोत्तम’ ही भारताची अनेक शतकांची परंपरा असल्याचे सांगून, प्रत्येक क्षेत्रात या परंपरेचा सुगंध दरवळत असतो, असे पंतप्रधान म्हणाले. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या नव्या युगात नवी पिढी मोठ्या जोमाने आणि जोशाने पुढे येत आहे, असे ते म्हणाले.

माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित करण्याकरता सुरु करण्यात आलेल्या ‘सेल्फ फॉर सोसायटी’ या पोर्टलचा त्यांनी उल्लेख केला. ‘वूई नॉट आय’ ही भावना लोकांना नक्कीच प्रोत्साहित करेल, असेही त्यांनी सांगितले.

पर्यावरण संरक्षणाच्या मुद्याबाबत अंर्तमुख होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. भारताचा दैदिप्यमान भूतकाळ आणि परंपरा याकडे लक्ष दिले आणि आदिवासींची जीवनशैली जाणून घेतली, तर आपल्याला भारतातील निसर्ग जाणून घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.

छोट्या लोकांपासून आपल्याला प्रेरणा मिळू शकते आणि याच लोकांमध्ये दृढ तत्व, नवीन मार्ग अधिक सक्षम करु शकतात, असे पंतप्रधानांनी सांगितले. पंजाबमधील गुरबचन सिंग या शेतकऱ्याने शेतातील तण जाळू नयेत असे आवाहन केले. पंजाबमधल्या कलार माजरा या खेड्यातील शेतकरी हे तण न जाळता नांगराद्वारे शेतातच पुन्हा गाडत आहेत, असे सांगून हे शेतकरी पर्यावरण स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी उत्तम प्रयत्न करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. एक छोटसे विधायक पाऊल सकारात्मक पर्यावरण निर्मितीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावते असे त्यांनी सांगितले.

जेव्हा जेव्हा जागतिक शांततेबाबत चर्चा होईल, त्या त्यावेळी भारताचा सहभाग आणि भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. दहशतवाद, वातावरण बदल, आर्थिक विकास तसेच सामाजिक न्याय यासारख्या विषयांवर जागतिक सहकार्य आणि समन्वयांने कार्य करण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

शाश्वत अन्न प्रणालीला प्रेरणा देण्यासाठी ‘फ्यूचर पॉलिसी गोल्ड ॲवॉर्ड 201’8 जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी सिक्कीमचे अभिनंदन केले. ईशान्य भारताने सेंद्रिय शेती क्षेत्रात भरीव विकास केला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. पंतप्रधानांनी धनतेरस, दिपावली, भाऊबीज आणि छट पूजेबद्दल देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email