सरकारी अधिका-याने लाच म्हणून १४ हजार रुपये व दोन किलो मटण बिर्याणी मागितली
अहमदनगर – अहमदनगरमधील एका सरकारी अधिकाऱ्याने कामाच्या मोबदल्यात लाच म्हणून १४ हजार रुपये रोख आणि दोन किलो मटण बिर्याणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव मंडलाधिकारी उल्हासराव कावडे असे असून एसीबीच्या पथकाने कावडे यांना १४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.
सदर तक्रारदाराकडे कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील मंडलाधिकारी उल्हासराव कावडे (वय ५७) याने लाच मागितली होती. तक्रारदाराने जमीन खरेदी केली होती. ते मंडलाधिकारी कावडे यांच्याकडे जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर स्वत:चे नावे लावण्यासाठी आणि जमीन खरेदी खताच्या नोंदणीसाठी गेले होते. या कामाच्या मोबदल्यात कावडे यांनी १४ हजार रुपये रोख आणि दोन किलो मटण बिर्याणी मागितली. तक्रारदाराने शेवटी नाशिकमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. बुधवारी दुपारी एसीबीच्या पथकाने कावडे यांना १४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. याप्रकरणी कावडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.