समग्र जल व्यवस्थापन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
नवी दिल्ली, 14 – जीवनातले पाण्याचे महत्व लक्षात घेऊन नीती आयोगाने समग्र जल व्यवस्थापन निर्देशांकावरचा अहवाल तयार केला असून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज त्याचे नवी दिल्लीत प्रकाशन केले.
जल संसाधनाच्या प्रभावी व्यवस्थापनात, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचे मूल्यमापन आणि त्यात सुधारणा करण्यासाठी हा निर्देशांक म्हणजे महत्वाचे साधन आहे. जल संसाधन मंत्रालय, पेयजल, स्वच्छता आणि ग्रामीण विकास मंत्रालय तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने जलविषयक माहिती आणि आकडेवारीचे अशा पद्धतीने प्रथमच संकलन करण्यात आले आहे.
जल संसाधनाच्या उत्तम व्यवस्थापनासाठी सुयोग्य उपाय आखण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्देशांक, राज्यांना आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि खात्यांना उपयुक्त माहिती पुरवेल.
2016-17 या संदर्भ वर्षात गुजरातला प्रथम क्रमांक त्यानंतर मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांना क्रमांक देण्यात आले आहेत.