सदनिकेच्या व्यवहारात फौजदाराला पावणेतीन लाखांचा गंडा ; वकील आणि पोलिसावर गुन्हा दाखल
(म.विजय)
बीड – येथील पेठ बीड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मोतीराम निकम यांना पुणे येथे सदनिका हस्तांतरित करून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून २ लाख ७० हजार रुपये घेऊनही हस्तांतरण करण्यास टाळाटाळ केल्याच्या आरोपावरून अहमदनगर येथील वकिल आणि त्याचा पोलिस दलात असलेल्या चुलत भावावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
याप्रकरणी सध्या नांदेड येथे सहा. पोलीस निरीक्षक पदावर असणारे मोतीराम तुळशीराम निकम यांनी फिर्यादीत नमूद केल्यानुसार ते २०११-१२ साली पेठ बीड ठाण्यात उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्या कालवधीत पुणे येथे वकिली व्यवसाय करणारे राजेंद्र नामदेव ठोंबरे (रा. पाथर्डी जि. अहमदनगर) यांच्यासोबत व्यावसायिक कामातून ओळख झाली. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेण्यानिमित्त दोघात अनेकदा फोनवरून संपर्क होत असल्याने चांगले व्यावसायिक संबंध निर्माण झाले. त्यानंतर निकम यांची नियुक्ती शिवाजीनगर ठाण्यात झाली.
२०१३ साली राजेंद्र ठोंबरे यांनी त्यांचा भाऊ कैलास कारभारी ठोंबरे (पो.ना. अश्वी पोलीस ठाणे, संगमनेर) याने पुण्यातील लोहगाव येथे महाराष्ट्र पोलीस मेगासिटी या ठिकाणी २ लाख ७० हजार रुपये देऊन सदनिकेची नोंदणी केली आहे, परंतु त्यास आर्थिक अडचणीमुळे सदर नोंदणीचे हस्तांतरण करावयाचे असल्याने तुम्ही ती नावावर करून घ्या असे सांगितले. निकम यांनी ठोंबरे यांच्यावर विश्वास ठेऊन दि. १९ ऑगस्ट २०१३ रोजी त्यांना ५० हजार रुपये रोख आणि माजी सैनिक पेन्शनच्या खात्यावरून उर्वरित २ लाख २० हजार रुपये डी.डी. स्वरुपात दिले. त्यानंतर सदनिकेबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही ठोंबरे यांनी सातत्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तरीसुद्धा निकम यांनी पाठपुरावा सुरूच ठेवल्याने राजेंद्र ठोंबरे आणि त्यांचा चुलत भाऊ कैलास ठोंबरे यांनी निकम यांच्यासोबत पुणे येथे समजुतीचा करारनामा केला.
त्यानंतरही सदनिकेबाबत टोलवाटोलवी सुरु असल्याने निकम यांनी सदनिकेचे सदस्यत्व रद्द करून रक्कम परत करण्याची विनंती केली. परंतु, ठोंबरे बंधूंनी रक्कमही परत केली नाही आणि सदनिका हस्तांतरणाबात कुठलेच कागदपत्र दिले नाहीत असे निकम यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून राजेंद्र ठोंबरे आणि कैलास ठोंबरे या दोघांवर कलम १२० ब, ४२०, ४०६, ३४ अन्वये शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.