सकल मराठा समाज दिवाळीत करणार नव्या पक्षाची स्थापना
(म.विजय)
कोल्हापूर – शैक्षणिक संस्था व शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलनाचे रान पेटवलेला सकल मराठा समाज आता थेट राजकीय आखाड्यात उतरणार आहे. येत्या दिवाळीचा मुहुर्त साधून सकल मराठा समाजाच्या वतीने राजकीय पक्षाची स्थापना केली जाणार आहे.
मराठा समाजाचा राजकीय पक्ष स्थापनेसंदर्भात कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरात मराठा समाजाचा मेळावा घेण्यात आला. त्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाच्या अस्तित्वासाठी राजकीय पक्षाची गरज असल्याचे एकमत झाल्याने आता मराठा समाजाचाही एक राजकीय पक्ष असणार आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर रायरेश्वर मंदिरात या नव्या पक्षाची स्थापना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. मराठा समाजाच्या हक्कांसाठी त्यांचा स्वतंत्र पक्ष असावा, या पार्श्वभूमीवर समाजबांधणीसाठी लोकांची मते जाणून घेतली जाणार आहेत.
त्यासाठी प्रत्येक ठिकाणी दौरे केले जाणार आहेत. त्याची सुरुवात बुधवारी कोल्हापूरमधून झाली. कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात या मुद्द्यावर सगळ्यांचे एकमत झाले आणि त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.