संपत्तीच्या वादातून भावडांनीच केली भावाची हत्या
अलिबाग – संपत्ती आणि घरगुती भांडणाचा राग मनात ठेवून भावडांनीच भावाची घरात घुसून हत्या केल्याची घटना आज अलिबाग तालुक्यातील झालखंड येथे घडली. सुरेश काशीनाथ नाईक (५०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर मृताचा भाऊ असलेला आरोपी फरार झाला आहे.
झालखंड येथील रहिवाशी सुरेश नाईक हे आपली पत्नी व मुलगा यांच्याबरोबर राहत होते. सुरेश नाईक हे तीन रूमच्या एकाच घरात दोन भावासह वेगळे वेगळे राहत होते. सुरेश आणि त्याच्या २ भावांमध्ये आपापसात संपत्तीवरून भांडणे होती. यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती. या रागातून नाईक यांच्या २ भावांनी शनिवारी दुपारच्या वेळी सुरेश नाईक यांच्या घरात घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यावेळी सुरेश नाईक यांच्या घरी नारळ काढण्यासाठी आलेल्या आदिवासी व्यक्तीलाही मारहाण करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
या घटनेनंतर सुरेश नाईक यांच्यावर वार करून दोन्ही भावांनी घटनास्थळावरून पलायन केले आहे. त्यानंतर सुरेश यांच्या पत्नी आणि मुलाने नाईक यांना जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डी. बी. निघोट व अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन माहिती घेतली. तर सुरेश नाईक यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.