संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
नगर – बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना पहाटे संगमनेर तालुक्यात घडली आहे. अश्विनी सिताराम कडाळे असं या मुलीचं नाव आहे. संगमनेरमधील मालदाड गावात राहणाऱ्या अश्विनीवर आज पहाटे बिबट्याने हल्ला केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
पहाटे प्रात:विधीसाठी अश्विनी आणि तिची आई घराबाहेर पडल्या होत्या. तेव्हा तिथे लपून बसलेल्या बिबट्याने अश्विनीच्या आईदेखतच तिच्यावर झडप घातली. तिच्या आईने घाबरून आरडाओरडा केल्याने अश्विनीचे वडील सिताराम कडाळे यांनी घरातून धावत येत बिबट्याला दगड फेकून मारला त्यानंतर बिबट्यांनी बिबट्या पळून गेला. मात्र, बिबट्याने अश्विनीच्या गळ्याचा चावा घेतल्याने तिचा मृत्यू झाला.
संगमनेर तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. त्यामुळे अन्न आणि पाण्याच्या शोधात हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत असून अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. घटनेची माहिती समजताच वनविभागाच्या कर्मचार्यांनी घटना स्थळी भेट देत पंचनामा केलाय. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून स्थानिक ग्रामस्थांनी या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.