श्यामची आई’ ते ‘कासव’ या सिनेप्रवासात ६६ मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार (विशेष वृत्त)

महाराष्ट्र शासनाच्या माहिती विभागालाही राष्ट्रीय पुरस्कार 

 

(म विजय)

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या 65 वर्षाच्या इतिहासात मराठी चित्रपटाने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. आजपर्यंत 66मराठी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, यातील 5 मराठी चित्रपटांना सर्वोच्च सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला आहे, तर पुरस्काराच्या विविध श्रेणीमध्ये मराठी चित्रपटाने आजपर्यंत 183 राष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत.

भारतीय चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवणारे दादासाहेब फाळके हे मराठीच.भारतीय चित्रपट क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलावंतांना त्यांच्याच नावाने सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. आजपर्यत देशातील 49दिग्गज कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे,यामध्ये 5 मराठी कलावंतांचा समावेश आहे. दुर्गा खोटे, व्ही. शांताराम, गानकोकिळा लता मंगेशकर, भालजी पेंढारकर व आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

देशातले पाहिले सुवर्ण कमळ मराठी सिनेमाला

राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची सुरुवात1953सालापासून झाली आणि पहिलेवहिले सुवर्ण कमळ मिळाले तेही मराठी सिनेमाला. प्रल्हाद केशव अत्रे दिग्दर्शित ‘श्यामची आई’ या चित्रपटाने सुवर्ण कमळावर आपले नाव कोरले. यानंतर श्वास, देऊळ,कोर्ट आणि कासव या मराठी चित्रपटांना सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला. आजपर्यंत देशातील 65चित्रपटांना सुवर्ण कमळ मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक 23सुवर्णकमळ हे बंगाली भाषेतील चित्रपटांना मिळाले आहेत,त्याखालोखाल हिंदी भाषेतील 13चित्रपट, मल्याळम भाषेतील 10चित्रपट तर कन्नड भाषेतील 6चित्रपटांना सुवर्ण कमळ मिळाले आहे.

तीन मराठी चित्रपटांची ऑस्कर वारी

सन 1957 पासून आजपर्यंत 50चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात आले, यामध्ये तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे .श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी व कोर्ट हे मराठी चित्रपट ऑस्करपर्यंत धडकले. हिंदी भाषेतील सर्वाधिक 32 सिनेमे ऑस्करसाठी पाठविण्यात आले,तामिळ भाषेतील 9 चित्रपट तर बंगाली व मल्याळम प्रत्येकी दोन व तेलगू भाषेतील एक सिनेमा ऑस्कर साठी पाठविण्यात आला होता. या50 चित्रपटांपैकी मदर इंडिया, सलाम बॉम्बे व लगान हे तीन हिंदी चित्रपटच ऑस्कर पुरस्कारासाठी नामनिर्देशित झाले होते.

महात्मा फुले ते कच्चा लिंबू…..

प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील 23 प्रादेशिक भाषेतील676 चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये 61 मराठी चित्रपटांचा समावेश आहे. 1954 साली प्र. के. अत्रे दिग्दर्शित महात्मा फुले हा मराठीतला पहिला चित्रपट प्रादेशिक भाषा श्रेणीत सर्वोत्कृष्ट ठरला होता. यानंतर मी तुळस तुझ्या अंगणी,शेवग्याच्या शेंगा,गृहदेवता,कन्यादान,माणिनी, पाठलाग असा प्रवास करीत किल्ला, रिंगण,दशक्रिया व आत्ताचा कच्चा लिंबू आदी मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात आपली मोहोर उमटविली आहे. प्रादेशिक भाषा श्रेणीत सर्वाधिक 82 पुरस्कार हिंदी भाषेतील चित्रपटांना मिळाले आहेत,यानंतर 80 पुरस्कार हे तामिळ भाषेतील चित्रपटांना तर बंगाली भाषेतील 79 चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पुरस्कार मिळाले आहेत.

सचिन पिळगावकर ठरले होते उत्कृष्ट बालकलाकार

उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार आजपर्यन्त 12 मराठी बाल कलाकारांना मिळाला आहे. यामध्ये10 पुरस्कार हे फिचर फिल्मसाठी तर2 पुरस्कार हे नॉन फिचर फिल्मसाठी मिळाले आहेत. मराठीतला पहिला बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना 1971 साली अजब तुझे सरकार या चित्रपटासाठी मिळाला होता. यानंतर मृण्मयी चांदोरकर ( कळत नकळत), अश्विन चितळे (श्वास), शंतनू रांगणेकर व मच्छीन्द्र गडकर ( चॅम्पियन्स) व बाबू बँड बाजा या चित्रपटासाठी विवेक चाबुकस्वार यांना उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाला आहे तर, हंसराज जगताप (धग),गौरी गाडगीळ व संजना राय (यलो),पार्थ भालेराव (किल्ला), यशराज क-हाडे (म्होरक्या) यांना विशेष उल्लेखनीय भूमिकेबद्दल राष्ट्रीय बालकलाकार पुरस्कार मिळालेला आहे. नॉन फिचर फिल्मसाठी अनिकेत रुमाडे (विठ्ठल) व पिस्तुल्या चित्रपटासाठी सुरज पवार यांना विशेष उल्लेखनीय समीक्षक पुरस्कार पुरस्कार मिळाला आहे.

 

सर्वोत्कृष्ट अभिनयाचे 5 पुरस्कार

आजपर्यंत देशातील 56 अभिनेते व54 अभिनेत्रींना उत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मराठी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी 3मराठी अभिनेत्यांना तर 2अभिनेत्रींना हा पुरस्कार मिळाला आहे. उपेंद्र लिमये ( जोगवा), गिरीश कुलकर्णी (देऊळ) व विक्रम गोखले ( अनुमती) यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे तर मिताली जगताप-वराडकर ( बाबू बँड बाजा) व उषा जाधव यांना धग या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.दिलीप प्रभावळकर यांना शेवरी व लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटासाठी व मनोज जोशी यांना दशक्रिया या चित्रपटासाठी  उत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

दिग्दर्शनासाठी नऊ पुरस्कार

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून 9 पुरस्कार मराठी चित्रपट दिग्दर्शकांना मिळाले आहेत. यामध्ये 4 पुरस्कार हे फिचर फिल्मसाठी तर 5 पुरस्कार नॉन फिचर फिल्मच्या दिग्दर्शनासाठी मिळाले आहेत. फिचर फिल्मसाठी शिवाजी लोटन पाटील यांना धग या चित्रपटासाठी तर राजेश मापुसकर यांना व्हेंटिलेटर या चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. कारकिर्दीतील पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी राजेश पिंजाणी यांना बाबु बँड बाजा या चित्रपटासाठी तर नागराज मंजुळे यांना फँड्री या चित्रपटासाठी इंदिरा गांधी पुरस्कार देण्यात आला आहे. यावर्षीचा उत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा पुरस्कारही नागराज मंजुळे यांना पावसाचा निबंध या  नॉन फिचर फिल्मसाठी  जाहीर झाला आहे. यापुर्वी  उमेश कुलकर्णी  ( गिरणी),विक्रांत पवार ( कातळ), रेणू सावंत ( अरण्यक ), आदित्य जांभळे ( आबा ऐकताय ना ?) यांना नॉन फिचर फिल्मसाठी  उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.

गायनासाठी आठ राष्ट्रीय पुरस्कार

पार्श्वगायनासाठी आजपर्यत देशातील100 गायक व गायिकांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे, यामध्ये मराठी चित्रपटातील गायनासाठी चार गायक व चार गायिकांना सन्मानित करण्यात आले आहे, यामध्ये अंजली मराठे, श्रेया घोषाल, आरती टिकेकर व बेला शेंडे या गायिका तर हरिहरन,सुरेश वाडकर,आनंद भाटे व महेश काळे या गायकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

दोन चित्रपटांना उत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार

परेश मोकाशी दिग्दर्शित एलिझाबेथ एकादशी व अमर भरत देवकर दिग्दर्शित म्होरक्या या चित्रपटांना उत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार मिळाला आहे. संगीत दिगदर्शनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार अजय अतुल ( जोगवा), व शैलेंद्र बर्वे  ( संहिता) यांना मिळाला आहे.

माहिती विभागाच्या फिल्मला पुरस्कार

महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित व दिनकर चौधरी दिग्दर्शित ‘चुनौती’ या एड्स या रोगावरील वैज्ञानिक चित्रपटास उत्कृष्ट नॉन फिचर फिल्म हा पुरस्कार 1992 साली 40 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

तंत्रज्ञानाच्या बाबतीत मराठी सिनेमा होतोय प्रगल्भ

मराठी सिनेमा सिने तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगल्भ होऊ लागला  आहे. सन 1979 पासून मराठी सिनेमाला उत्कृष्ट कला दिग्दर्शन,ध्वनिमुद्रण,नृत्यदिग्दर्शन, उत्कृष्ट संपादन, मेकअप, पटकथा या क्षेत्रात25 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

नॉन फिचर फिल्मसाठी दोन सुवर्ण व तीन रजत कमळ

नॉन फिचर फिल्म या श्रेणीत मराठी भाषेतील फिल्मसाठी दोन सुवर्ण कमळ मिळाले आहेत. सन 2002सालातील नारायण गंगाराम सुर्वे या अरुण खोपकर दिग्दर्शित नॉन फिचर फिल्मला सुवर्ण कमळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, व उमेश कुलकर्णी दिग्दर्शित गिरणी या चित्रपटासही सुवर्ण कमळ मिळाले आहे. दिग्दर्शनतील पहिली नॉन फिचर फिल्मसाठी मराठीतील तीन चित्रपटांना रजत कमळ पुरस्कार देण्यात आला आहे. रीना मोहन दिग्दर्शित कमलाबाई, विणू चोलीपरामबील दिग्दर्शित विठ्ठल तर निशांतराय बोंबारडे दिग्दर्शित दारवठा या चित्रपटांना रजत कमल मिळाले आहे.

चित्रपटवरील लेखनासाठी 4मराठी पुस्तकांना सुवर्ण कमळ

चित्रपटवरील लेखनासाठी मराठी भाषेतील चार मराठी पुस्तकांना सर्वोच्च अशा सुवर्ण कमळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अरुण खोपकर लिखित “गुरू दत्त: तीन अंकी शोकांतिका” या पुस्तकास मराठीतला पहिला सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला. “सिनेमाची गोष्ट” हे अनिल झंकार लिखित पुस्तक, अरुणा दामले लिखित ” मराठी चित्रपट संगीताची गोष्ट ” व “मौलिक मराठी चित्रगीते ” या गंगाधर महांबरे लिखित पुस्तकासही सुवर्ण कमळ पुरस्कार मिळाला आहे.

 

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email