शैक्षणिक उपक्रमांच्या जत्रेला उस्फुर्त प्रतिसाद
उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले शिक्षकांचे अभिनंदन
ठाणे – ज्ञानरचनावादी साहित्य , वाचन क्षमतेचा विकास, ई-लायब्ररी , मनोरंजनातून शिक्षण, हस्त कौशल्यातून विद्यार्थी विकास , प्रगत शाळेतून विद्यार्थी विकास, आनंददायी इंग्रजी शिक्षण, गंमत चुंबकाची यासारख्या असंख्य पद्धतीचा अवलंब करत भाषा , गणित , विज्ञान विषयाचा सहज आणि सोपा अभ्यास करता येतो. ही बाब अधोरेखित करणारा आम्ही साधक प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे अर्थात शैक्षणिक उपक्रमांची जत्रा या नाविन्यपूर्ण उपक्रमाची बुधवारी सांगता झाली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, जि.प. सदस्य संजय निमसे , राजेंद्र विशे उपस्थित होते.
शहापूर तालुक्यातील आत्मा मलिक शैक्षणिक संकुलात दोन दिवशीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कृती युक्त शिक्षण पद्धतीचा मोठा प्रमाणात उपयोग केला जात असून जिल्हातील अनेक शिक्षकांनी पारंपारिक तसेच आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करत अभ्यासाच्या विविध पद्धती शोधल्या आहेत.त्यांचे प्रदर्शन या उपक्रमातून मांडण्यात आले होते. तब्बल ३८ नाविन्यपूर्ण शैक्षणिक मॉडेल यावेळी पाहायला मिळाले. विद्यार्थी व शिक्षकांनी या प्रदर्शनाला उस्फुर्त सहभाग दर्शवला.
यावेळी उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्टॉलला भेट देऊन अभ्यासपद्धती समजून घेतल्या व शिक्षकांचे अभिनंदन केले. तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजुषा जाधव यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले होते. या उपक्रमातून शिक्षकांनी तयार केलेल्या मॉडेलला व्यासपीठ उपलब्ध झाले. त्यांनी विकसित केलेली अभ्यास पद्धत त्यांच्या शाळेपुरती मर्यादित न राहता सर्वश्रुत झाल्याने त्याचा फायदा निश्चितच सर्वाना होईल असे मत शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी व्यक्त केले. सांगता सोहळ्यास आडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्कर बरोरा , शहापूर गट शिक्षणाधिकारी आशिष झुंझारराव तसेच मुरबाड , कल्याण गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते.