शिवणे औद्योगिक वसाहतीत टेंपो पेटला; केबिन जळून खाक

(म.विजय)

पुणे – शिवणे औद्योगिक वसाहतीमध्ये लोखंडी बॉक्स घेऊन आलेल्या एका टेंपोला आग लागण्याची घटना आज बुधवार (दि.७) सकाळी दहा वाजता घडली. वायरिंग मध्ये शॉर्ट सर्कीट झाल्याने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला असून, यामध्ये टेंपोचे केबिन जळून खाक झाले.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवराज हनुमंत मोडी हे आपल्या ताब्यातील आयशर कंपनीचा टेंपो क्र. एमएच १६ क्यू ६२८६ मध्ये लोखंडी बॉक्स घेऊन ताथवडे, चिंचवड येथून शिवणे औद्योगिक वसाहतीमधील दांगट पाटील नगर, सर्व्हे नं ८६ येथे असलेल्या विद्युत कंट्रोल ऑटोमेशन कंपनी समोर आज बुधवार (दि.७) सकाळी दहाच्या सुमारास आले. टेंपो बाजूला उभा करून ते चहा पिण्यासाठी गेले असताना, अचानक टेंपोला आग लागली.

यावेळी विद्युत कंट्रोल मधील कर्मचाऱ्यांनी ड्राय केमिकल अग्निशमन यंत्राने टेंपोची आग विझवण्याचा प्रयत्न केला. एवढ्यात दाखल झालेल्या सिंहगड रस्ता अग्निशमन दलाच्या तांडेल रोहिदास दुधाने,जवान संतोष भिलारे,भरत गोगावले, सुनील धिवाडकर, भरत पवार, चालक रमेश गायकवाड यांच्या पथकाने टेंपोच्या केबिनवर पाण्याचा मारा करून आग शांत केली.

सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिवणे औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या असून, त्यामध्ये आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यातच शिवणे आणि उत्तमनगर परिसरात नागरीकरण वाढले असून, मोठ्या प्रमाणात सोसायट्या, इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र या भागात आगीची घटना घडल्यास किमान कोथरूड किंवा सिंहगड रस्ता भागातून अग्निशमन दलाची गाडी येते. त्यात बराचसा वेळ जात असल्याने आगीने मोठे नुकसान होते. पर्यायी वारजे अथवा नव्याने समाविष्ठ झालेल्या शिवणे, उत्तमनगर भागात महानगरपालिकेने एक अग्निशमन केंद्र सुरु करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दांगट यांनी केली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email