शिर्डीत गुटखा विक्री जोमात
नगर – साईबाबांच्या नगरीत सध्या गुटखा, मटका या धंद्यांना अच्छे दिन आहे. कमी पैशात अधिक कमाई याद्वारे होत असल्याने अनेकांची या धंद्यात उड्या घेतल्या आहे. एकीकडे हाँटेल, लाजिंग, फुल दुकान अन्य व्यवसायाला उतरती कळा आल्याने हे धंदे कोमात गेले असले तरी गुटखा, मटका धंदे जोमात असे विरोधास असलेले चित्र दिसत आहे. शासनाने गुटखा बंदी केल्यावर सुरुवातीला प्रशासनाने या विरोधात कारवाई मोहीम सुरु केली होती.
सुरुवातीला चोरी चोरी छुपके छुपके असे धंदे केले जात. मात्र, आता प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याने आता हे धंदे खुलेआम सुरु झाले आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातली असताना शिर्डीत मोठ्या जोमात गुटखा विक्री केली जात आहे. नगरपंचायतने चकाचक केलेल्या रस्त्यांवर ठिकाणी गुटख्यांच्या पिचकाऱ्या तसेच रिकाम्या पुड्या असे विदारक चित्र दिसत असल्याने नगरपंचातच्या स्वच्छता मोहिमेला हरताळ फासला जात आहे.
पानटपरी, हातगाड्या, किराणा दुकान, थंडपेयाचे दुकान आदी ठिकाणी गुटखा सर्रासपणे विकला जातो. गुटखा शौकिनही एक दोन पुड्या घेण्याऐवजी एकदाच दहापाच पुड्या खरेदी करताना दिसतात. खिशात गुटख्याची माळच असल्याने एक संपली की लगेच दुसरी तोंडात टाकली जाते. शासनाची गुटखा बंदीचा आदेश या व्यावसायकांच्या पथ्यावर पटला आहे. किमतीपेक्षा अधिक दराने गुटखा विक्री केली जात असल्याने नफ्यात वाढ झाली आहे.
जास्त विक्री करुन जेवढे पैसे मिळत नव्हते, तेवढे पैसे कमी पुड्या विक्री करुन मिळत आहे.. शिर्डी नगरपंचायतच्या वतीने ‘स्वच्छ शिर्डी- सुंदर शिर्डी’ मोहीम हाती घेतली आहे. वर्षभराच्या कालावधीत नगरपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डी कचरा मुक्त करुन शहर स्वच्छ केले आहे. रस्त्यांवर दिसणारी माती, कचरा आता गायब झाल्याने शहरात स्वच्छतेचे दर्शन येणाऱ्या साईभक्तांना दिसत आहे.