शाळेतील स्टाफ रुममध्ये निघाला कोब्रा, शिक्षकांचा उडाला थरकाप
कल्याण – कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे गावात शेतकरी माध्यमिक विद्यालयात शिक्षकांसाठी असलेल्या स्टाफ रुममध्ये कोब्रा निघाला. यामुळे उपस्थित शिक्षकांचा थरकाप उडाला.
कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे गावात शेतकरी माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेला उन्हाळी सुट्टी सुरू आहे. मात्र काही शिक्षक शाळेच्या स्टाफ रुममध्ये बसून शाळेची सुट्टी संपल्यानंतरचे नियोजन करण्यासाठी रोजच्या प्रमाणे आले होते. सकाळी साडे दहाच्या सुमारास स्टाफ रुमचा दरवाजा उघडून कर्मचाऱ्याने रूमची साफसफाई केली आणि निघून गेला. त्यानंतर रुममध्ये उपस्थित असलेले शिक्षक कामात व्यस्त होते. त्याच सुमाराला वाबडे नावाचे शिक्षक कपाटातून पुस्तक काढण्यासाठी गेले. त्यांना पुस्तकांच्या कपाटात वेटोळे घालून बसलेला कोब्रा नाग दिसला. त्याला पाहताच त्यांचा थरकाप उडाला. त्यांनी तत्काळ कोब्रा नाग आपल्या स्टाफ रुममध्ये शिरल्याची माहिती इतर शिक्षकांना देताच सर्वांनीच स्टाफ रुमबाहेर पळ काढला.
वाबडे यांनी सर्पमित्राला मोबाईलवर संपर्क साधून नाग शिरल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र हितेश करनजावकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांना कोब्रा नागाला पकडण्याच्या प्रयत्न केला असता तो कपाटातून निसटला. अखेर १० ते १५ मिनिटांने या कोब्रा नागाला सर्पमित्र हितेशने पकडले. या नागाला वन अधिकाऱ्यांची परवानगी घेवून जंगलात सोडण्यात येणार आहे. हा नाग साडेतीन फुटाचा इंडियन कोब्रा असल्याची त्यांनी माहिती दिली.