शबरीमला मंदिराप्रमाणे मशिदीत महिलांचा प्रवेश करवून दाखवा – हिंदु जनजागृती समिती
केरळमधील कम्युनिस्ट शासनाचा उघड हिंदु धर्मद्रोह !
शबरीमला मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा खंडित करण्यासाठी केरळच्या हिंदुविरोधी कम्युनिस्ट सरकारने आकाशपाताळ एक करायचे ठरवले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अय्यप्पाभक्त शांततेने आंदोलन करत असतांना त्यांच्या भावनांचा अपमान करण्याचा प्रयत्न केरळ राज्य सरकारने केला. त्यांनी 40 वर्षे वयाच्या दोन महिलांना अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून मंदिराच्या नजिक नेले, नंतर काळ्या बुरख्यात आणि पोलिसांच्या पहार्यात गुपचूप मंदिरात प्रवेश करून दिला. या महिला श्री अय्यप्पाच्या भक्त नसून, कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्या असल्याचे आता उघड झाले आहे. कोणतीही भक्ती नसतांना असा छुपा प्रवेश करून काय साध्य होणार आहे ? हा तर केवळ हिंदु धर्म, श्री अय्यप्पा भगवान आणि करोडो भक्त यांचा विश्वासघात आहे. ‘काहीही करा, पण हिंदूंच्या मंदिरांतील धार्मिक परंपरा नष्ट करा, हिंदूंची मंदिरे भ्रष्ट करा’ असेच प्रयत्न कम्युनिस्ट शासन करतांना दिसत आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. जर केरळमधील कम्युनिस्ट सरकार खरोखरंच पुरोगामी आणि रूढींच्या विरोधात आहे, तर त्याने अशाच प्रकारे केरळच्या जामा मशिदीत मुसलमान महिलांना पोलिसांच्या संरक्षणात घुसवून दाखवावे, असे आव्हान हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिले आहे.
धर्मशास्त्रांत ‘कर्मफलसिद्धांत’ही सांगितला आहे. यानुसार या कृत्याचे पाप अर्थातच केरळ शासन आणि धर्मविरोधी कृत्य करणारे यांना भोगावे लागेल, हे निश्चित आहे. श्री अय्यप्पा स्वामींच्या भक्तांनी शांततामय मार्गाने आंदोलन केले असतांनाही केरळमधील कम्युनिस्ट सरकारने पोलिसी बळाचा वापर केला. त्यांनी भक्तांच्या संकीर्तनावर लाठीचार्ज करून शेकडोंना जखमी केले, महिलांवरही लाठ्या चालवल्या. भक्तांच्या गाड्या तोडण्यात आल्या. आतापर्यंत हे आंदोलन चिरडण्यासाठी तब्बल 5000 हून अधिक भक्तांवर गुन्हे दाखल केले. केरळ सरकारने हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नये. केरळ सरकारला कथित स्त्री-पुरुष समानता आणायचीच असेल आणि त्यांच्यात हिंमत असेल, तर महिलांना प्रवेशबंदी असलेल्या केरळमधील मलांकारा मारथोमा सिरीयन चर्च आणि मशिदींमध्ये महिलांना असे घुसवण्याचे धाडस दाखवावे, असेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.