वैध मापन शास्त्र विभागाला ऑर्डर ऑफ मेरिट-स्कॉच अवॉर्ड
मुंबई, दि.३० – वैध मापन शास्त्र यंत्रणेद्वारे परवाना देणे, नुतनीकरण करणे, नोंदणी करणे व नामनिर्देशन नोंदणी या संगणकीय सेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्यात आल्या आहेत. या संगणकीकरण प्रकल्पाची प्रगती तसेच समाज व सर्वसामान्यांना होणार असलेला लाभ विचारात घेऊन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या वैद्य मापन शास्त्र यंत्रणेस ‘ऑर्डर ऑफ मेरिट -स्कॉच अवॉर्ड- सिल्व्हर (SKOCH AWARD-)2018’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे.
या पुरस्कारासाठी देशभरातून 3500 पेक्षा जास्त नामनिर्देशन प्राप्त झाली होती. यामधून 1200 प्रोजेक्टची निवड सादरीकरण करण्यासाठी करण्यात आली होती. सादरीकरण व मुल्यमापन केल्यानंतर या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या वैद्य मापन शास्त्र यंत्रणेस ‘ऑर्डर ऑफ मेरिट-स्कॉच अवॉर्ड- सिल्वर (ORDER OF MERIT Skoch Award-SILVER) दिनांक 23 जून 2018 रोजी मिळाले.
‘डिजीटल इंडीया’ व ‘उद्योग सुलभता’ या महत्वकांक्षी योजनेंतर्गत अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, व श्री. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली वैध मापन शास्त्र यंत्रणेद्वारे देण्यात येणाऱ्या सेवांचे संगणकीकरण करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली होती.
वैध मापन शास्त्र यंत्रणेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सेवांचे संगणकीकरण करण्यासाठी सेवांची यादी व कार्यप्रणाली अप्पर पोलीस महासंचालक तथा वैध मापन शास्त्र नियंत्रक अमिताभ गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली अंतीम करण्यात आली. या यंत्रणेच्या संगणकीकरणाद्वारे वैध मापन शास्त्र यंत्रणेतील अधिकारी व व्यापारीवर्ग यांच्यासाठी एक मंच उपलब्ध होणार आहे. कामकाजामध्ये पारदर्शकता व सुलभता येणार असून यंत्रणेच्या कार्यक्षमतेतही वाढ होणार आहे. श्री. अमिताभ गुप्ता व त्यंच्या टिमने प्रोजेक्ट गो-लाईव करण्यासाठी सुरवातीपासूनच मेहनत घेतलेली आहे.