वृद्ध महिलेला भुरळ घालत दागिने लंपास – डोंबिवलीतील घटना
(श्रीराम कांदु)
डोंबिवली दि.१९ – साबण विकण्याचा बहण्याने घरात घुसून वृद्ध महिलेला भुरळ घालत तिच्या जवळील ६० हजारांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना कल्याण पश्चिम टिळक चौक परिसरात घडली आहे.
कल्याण पश्चिम टिळक चौक भिडे गल्ली येथील निवारा संकुल येथे राहणारे विनय नातू ( ६१ ) यांची आई बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरात एकटी असताना एक अज्ञात इसम त्यांच्या घरी साबण विकण्याच्या बहण्याने आला. त्याने नातू यांच्या वृद्ध आईला बोलण्यात गुंतवून भुरळ घालत त्यांच्याकडून ६० हजारा किमतीचे सोन्याचे दागिने हिसकवले व तेथून पळ काढला. काही वेळाने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. विनय नातू घरी आल्यानंतर त्यांच्या आईने त्यांना घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी नातू यांनी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.