विद्यार्थ्यांना लुबाडणारा मिरजेचा पोलीस अधिकारी निलंबित

मिरज – जेवणानंतर वैद्यकिय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर फिरणार्‍या दोन विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेऊन पैसे उकळणारा सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब पाटील याची पोलखोल सांगली जिल्हा सुधार समितीने व्हिडिओ चित्रीकरण करून केल्याने मंगळवारी त्याला निलंबित करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास, दोन डी. फार्मसीचे विद्यार्थी जेवणानंतर फिरण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर गेले होते. त्याच वेळी गस्तीच्या पोलिसांनी त्यांना का फिरत आहात अशी विचारणा करून जबरदस्तीने त्यांना गाडीत डांबून पोलीस ठाण्यात नेले. विद्यार्थ्यांनी भिती पोटी सुधार समितीच्या नितीन मोरेंना पोलीस ठाण्यात मदतीसाठी बोलावले. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब पाटील याने ५००० रुपये द्या अन्यथा गुन्हा दाखल करतो असे संबंधितांना धमकावले.

समितीच्या मोरेंनी याला विरोध केला, मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण व आयुष्य यामुळे घाबरलेल्या पालकांनी पोलीस अधिकारी पाटील सांगतील त्याप्रमाणे जबरदस्तीने दोन हजार रुपये देऊन विनाकारण गुन्हा दाखल करू नये अशी विनंती केली. मात्र सदरची घटना समितीच्या नितीन मोरेंनी कॅमेर्‍यात कैद केली व व्हायरल केली. तसेच समितीच्या वतीने याची तक्रार व पाठपुरावा करण्यात आला. यामुळे मंगळवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब पाटील याच्यावर प्रशासनामार्फत निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत करत पोलिसांनी सामान्यांच्या रक्षणासाठी काम केले पाहिजे अशी भावना व्यक्त केली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email