विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात बॉम्बची अफवा
(श्रीराम कांदु)
डोंबिवली,दि. १५ – कल्याण नजीक विठ्ठलवाडी रेलवे स्थानकाला बॉम्बने उडविणार असल्याचा निनावी फोन सकाळच्या सुमारास रेल्वे कंट्रोल ला खणाणला.समोरून बोलणाऱ्या अज्ञात इसमाने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याची माहिती दिल्याने रेल्वे प्रशासनसह पोलीस यंत्रणा ही चांगलेच हादरले. याबाबत माहिती मिळताच रेलवे आरपीएफ, जीआरपी, तसेच कल्याण शहर पोलिसानी बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉड सह विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर धाव घेत शोध सुरू केला. रेल्वे स्थानकांचा कोपरा न कोपऱ्याचा शोध घेतला मात्र काहीच आढळून न आल्याने ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले .त्यामुळे पोलिसांसह रेल्वे प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा पाहून प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण दिसून येत होते.मात्र ही अफवा असल्याचे समजताच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला .